लोकसभेसाठी मनसे कामाला, टेन्शन कुणाला? 'या' 20 मतदार संघात उमेदवार देणार

लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यानुसार मनसेने लोकसभा निवडणुसाठी कंबर कसली आहे. राज्यात तब्बल 20 जागांवर मनसे उमेदवार देण्याची चर्चा असून त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरु केली आहे. 

राजीव कासले | Updated: Nov 21, 2023, 06:49 PM IST
लोकसभेसाठी मनसे कामाला, टेन्शन कुणाला? 'या' 20 मतदार संघात उमेदवार देणार title=

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टक्कर देण्यासाठी नवा भिडू सज्ज झालाय.  राज ठाकरेंची (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS). आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) स्वबळावर लढवण्याचा निर्णय मनसेनं घेतलाय. त्यासाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू झालीय. मनसेच्या नेत्यांनी राज्यभरात पाहणी करून एक अहवाल तयार केलाय. मनसेनं लोकसभा निवडणूक लढवावी, यासाठी जनतेनं कौल दिल्याचा दावा या अहवालात पक्ष निरीक्षकांनी केलाय. लोकसभेच्या 20 जागा मनसे लढवणार असल्याचं समजतंय.

मनसेचे संभाव्य उमेदवार 
कल्याणमधून राजू पाटील, ठाण्यातून अभिजित पानसे किंवा अविनाश जाधव,  पुण्यातून - वसंत मोरे, दक्षिण मुंबईतून - बाळा नांदगावकर, दक्षिण मध्य मुंबईतून नितीन सरदेसाई, ईशान्य मुंबईतून संदीप देशपांडे, उत्तर मुंबईतून अविनाश अभ्यंकर, उत्तर पश्चिम मुंबईतून शालिनी ठाकरे, नाशिकमधून डॉ. प्रदीप पवार किंवा दिलीप दातिर, संभाजीनगरमधून प्रकाश महाजन, सोलापूरमधून दिलीप धोत्रे, चंद्रपूरमधून राजू उंबरकर, रायगडमधून वैभव खेडेकर हे उमेदवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

मनसे निरीक्षकांचा हा अहवाल राज ठाकरेंना सादर करण्यात आलाय. राज ठाकरे बुधवारी आणि गुरुवारी लोकसभा मतदारसंघनिहाय बैठका घेऊन आढावा घेणार आहेत. या बैठकीतच संभाव्य उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं समजतंय..

मनसे कामाला, टेन्शन कुणाला?
मनसेनं 2009 च्या निवडणुकीत 13 आणि 2014 च्या निवडणुकीत 11 उमेदवार उभे केले होते. तर 2019 ची निवडणूक मनसेनं लढवली नव्हती. मात्र लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोदींविरोधात सभा घेतल्या होत्या. यंदा लोकसभेला मनसेचं इंजिन कुणाला धडकणार आणि कुणाचं गणित बिघडवणार, याची चर्चा सुरू झालीय.

मनसेचा स्वबळाचा नारा
आगामी निवडणुकीत मनसेने स्वबळावर लढण्यााचा निर्णय घेतल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मनसेचं इंजिन लोकसभा निवडणुकीत एकटंच धावणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणुकीस स्वबळावर सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा, असे आदेशच ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत. काही महिन्यांपुर्वी मनसेने एक टीझर (Teaser) लाँच केल होता. या टीझरमध्ये 'चला हे चित्र बदलूया… आपण महाराष्ट्राला पर्याय देऊया…, चला नव्याने स्वप्न पाहूया… महाराष्ट्र घडवूया…', असं सांगण्यात आलं होतं. या टीझरला 'महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी घसरली आहे असं वाटतं ना? चला तर मग 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' पर्याय द्यायला तयार आहे…!, असं कॅप्शन देण्यात आलं होतं.