एस टी संपाबाबत मोठी बातमी, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाने चपराक लावली आहे

Updated: Dec 24, 2021, 05:47 PM IST
एस टी संपाबाबत मोठी बातमी, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास न्यायालयाचा नकार title=

मुंबई : विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटी महामंडळाने अनेक वेळा आवाहन करुनही एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. 

या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर आणि यवतमाळ इथल्या कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित ९ कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.

लातुर आणि यवतमाळ विभागातील बेकायदेशीर संपामध्ये सहभागी झालेले कर्मचारी विरोधात नियोजीत कामगिरीवर गैरहजर, एसटीच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, एसटीची वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे, या कारणांसाठी दोषारोप पत्र दाखल करून, समक्ष सुनावणी घेऊन राज्य परिवहन सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी कारणमिमांसा नोटीस बजावली होती.
 
या नोटीसीच्या विरोधात संबंधित कर्मचाऱ्यांनी  कामगार न्यायालय, लातुर आणि यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निकाल देताना  कामगार न्यायालयाने संबंधित अर्जदाराची तक्रार अवैध ठरवून एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला. 

कर्मचारी सेवेतून बडतर्फ
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभाग असलेल्या ९ कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाच्या सेवेतून आज बडतर्फ करण्यात आलंय. पहिल्या टप्प्यात ९ जणांना बडतर्फ करण्याच्या नोटीस एसटी महामंडळाने पाठवल्या होत्या. याविरोधात ९ कर्मचाऱ्यांनी  लातूरच्या कामगार न्यायालयामध्ये स्थगिती मिळविण्यासाठी अपील दाखल केले होते. मात्र कामगार न्यायालयाने या आठही कर्मचाऱ्यांचे अपील फेटाळलं असून ९ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या महामंडळाच्या निर्णयाला समर्थन दिलंय.  

लातूर जिल्ह्यातील २८७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यापैकी १२ कर्मचारी कामावर हजर झाले असून आणखी २६७ कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. २३ डिसेंबर मध्यरात्री पर्यंत जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची मुदत एसटीच्या लातूर विभागाने दिली होती. त्यापैकी फक्त १९ कर्मचारीच कामावर रुजू झाले आहेत. सध्या लातूर, निलंगा आणि औसा डेपोतील काही बसेस सुरु आहेत तर उदगीर आणि अहमदपूर डेपो पूर्णपणे बंद आहेत.