मुंबईत मराठी माणसाला 50 टक्के घरं हवीच, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आरक्षणाची मागणी

मुंबईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य मराठी माणूस हे घर विकत घेऊ शकत नाही.यावर उपाय म्हणून पार्ले पंचम ह्या सामाजिक संस्थेचे श्रीधर खानोलकर यांनी 50 टक्के घरे मराठी माणसांसाठी आरक्षित करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

राजीव कासले | Updated: Oct 12, 2023, 04:49 PM IST
 मुंबईत मराठी माणसाला 50 टक्के घरं हवीच, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आरक्षणाची मागणी title=

Mumbai Marathi Home : मुंबई... मराठी माणसाची मुंबई... मात्र याच महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी (Marathi) माणसाला जागा नाकारण्याचे प्रकार वाढलेत. मुलुंडमध्ये एका गुजराती बहुल सोसायटीनं तृप्ती देवरूखकर या मराठी महिलेला जागा नाकारल्यानं हा मुद्दा ऐरणीवर आला. आता अमराठी, शाकाहारी लॉबीची मुजोरी मोडीत काढण्यासाठी एक नवी मागणी पुढं आलीय.

मराठी माणसाला घर देता का घर? 
मुंबईत नव्या इमारतींमधील 50% सदनिका मराठी माणसांसाठी राखीव (Reservation) ठेवाव्यात, अशी ही मागणी आहे. पार्ले पंचम या संघटनेनं मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) पत्र पाठवून ही मागणी केलीय. नव्या इमारतींमधील 20% घरं लहान आकाराची हवीत, असंही या पत्रात म्हटलंय. मुंबईतल्या काही इमारतींमध्ये मांसाहारी मराठी लोकांना घर नाकारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर काही वेळा बिल्डरांकडूनही मराठी माणसाची अडवणूक केली जाते. त्यामुळे नव्या इमारतीत घरांचं बुकिंग सुरु झाल्यानंतर पुढचं एक वर्ष मराठी माणसासाठी 50 टक्के आरक्षण ठेवावं असा पर्याय ठेवावा अशी मागणीही करण्यात आली आहे. एक वर्षानंतर मराठी माणसांकडून बिल्डरला ती घरं कोणालाही विकण्याची परवानगी असेल असंही पार्ले पंचम या समाजिक संस्थेने म्हटलं आहे.

20 टक्के घरं लहान आकाराची
गेल्या काही वर्षात मुंबईत टोलेजंग इमारती बांधल्या जात असून अलिशान घरं बांधली जात आहेत. या घरांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. त्यामुळे अशा इमारतीत 20 टक्के घरं ही लहान आकाराची ठेवण्यात यावीत, या घरांसाठी एक वर्ष केवळ मराठी माणसासाठी आरक्षण असावं, तसंच या घरांचा मेन्टेंनन्सही परवाडणारा असावा असंही मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमुद करण्यात आलं आहे. 

काहीवेळा अलिशान घरं घेण्याची आर्थिक ताकद असतानाही मराठी माणसाला ते मांसाहारी असल्याचं कारण सांगत बिल्डर घर विकण्यास तयार होत नाही, ही मराठी माणसाची शोकांतिका आहे, हा प्रकार मोडीत काढला जावा अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे. 

मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडलेत. मोठमोठ्या गगनचुंबी टॉवर्समधील घरं मराठी माणसांना परवडत नाहीत. त्यात अमराठी भाषकांची मुजोरी वाढीला लागलीय.. त्याला अमराठी बिल्डर लॉबीचीही साथ मिळतेय.. अशा परिस्थितीत मुंबईत मराठी टक्का टिकावा, यासाठी घर खरेदीत आरक्षणाची मागणी पुढं आलीय.. 

पार्ले पंचम संस्थेने हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही पाठवण्यात आलं आहे.