महापौर किशोरी पेडणेकरांचा कौटुंबिक गाडीला नकार

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवडून आलेल्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी कौटुंबिक गाडी नाकारली आहे. 

Updated: Dec 1, 2019, 11:10 AM IST
महापौर किशोरी पेडणेकरांचा कौटुंबिक गाडीला नकार title=

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी निवडून आलेल्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांनी कौटुंबिक गाडी नाकारली आहे. महापौर निधीतून गरिबांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याचा त्यांचा मानस आहे. गरीब रूग्णांना महापैर निधीतून अधिक मदत उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याची माहिती त्यांनी शुक्रवारी दिली. 

कौटुंबिक गाडीसाठी वाचणारा पैसा महापौर निधिसाठी देण्यात यावा, अशी मागणी आपण पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापौरपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी पत्रकार कक्षाला भेट दिली. महापौर किशोरी पेडणेकरांसोबत त्यांचे वकिक अॅड.सुहास वाडकर देखील उपस्थित होते. 

'महापौर म्हणून प्रोटोकॉलनुसार एक वैयक्तिक गाडी आणि कौटुंबिक गाडी देण्यात येत. पण माझ्या कुटुंबाला गाडीची आवश्यकता नाही. त्यामुळे आपण गाडी घेणार नाही. गाडीसाठी केला जाणारा खर्च इंधन इत्यादी महापौर निधीला दिला जावा.' असे आवाहन आपण करणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.

महापौरांनी आपल्या अडीच वर्षाच्या कारकीर्दीत केल्या जाणाऱ्या कामाबद्दलची माहिती दिली. मुंबईत सध्या प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्लास्टिकमुक्त मुक्त राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासोबत चर्चा करून नव्या उपाययोजना अंमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवाय, ओला कचरा आणि सुका कचरा याचे वर्गीकरण, स्वतंत्र विल्हेवाट, राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यासोबत चर्चा करून नव्या उपाययोजना अंमलात आणण्यात येतील. मुंबईतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. यातून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी खड्डे आणि धुळमुक्त रस्ते देण्याची घोषणा मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.