मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे

आकाश नेटके | Updated: Aug 26, 2023, 12:35 PM IST
मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळापत्रक   title=

Mumbai Local : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक (Railway Mega Block) घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर रविवारी, तर पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवारी रेल्वेनं प्रवास करण्यासाठी घराबाहेर पडणार असला तर मेगा ब्लॉकबाबत माहिती करुन घ्यावी. दुसरीकडे पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) सुरतमधील 56 तासांच्या ब्लॉकमुळे हजारो प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. 59 रेल्वेगाड्या रद्द तर 30 गाड्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे

मध्य रेल्वेवर ठाणे – कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या लोकल त्यांच्या स्थानकांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. या गाड्या त्यांच्या नियोजित आगमन वेळेपेक्षा 10  मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील. तसेच कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत  सुटणाऱ्या अप जलद/अर्धजलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड स्थानकापुढे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. 

यासोबत सीएसएमटी दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादरला येणार्‍या अप मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण आणि ठाणे/विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

हार्बर मार्ग

हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे ब्लॉक काळात सीएसएमटी – पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा, पनवेल – ठाण्याकडे जाणाऱ्या अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा, नेरूळ – ठाणे लोकल सेवा, नेरूळ – खारकोपर लोकल सेवा बंद असणार आहेत. तर बेलापूर – खारकोपरदरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावतील. सीएसएमटी – वाशी भागात विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच ठाणे – वाशी स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर सेवा सुरु असणार आहे.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड – वैतरणादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी 11.50 वाजेपासून ते दुपारी 2.50 वाजेपर्यंत आणि डाऊन जलद मार्गावर रात्री 1.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी गाडी क्रमांक 19101 विरार – भरूच मेमू विरारवरून पहाटे 4.30 ऐवजी पहाटे 4.50 वाजता सुटेल.