काळजी घ्या, राज्यात कोरोना मृत्युचं प्रमाण वाढलं

जगभरात ७० हजारावर बळी

Updated: Apr 6, 2020, 07:09 PM IST
काळजी घ्या, राज्यात कोरोना मृत्युचं प्रमाण वाढलं title=

दीपक भातुसे, मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८०० च्या वर गेली असून ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या बळींची संख्या ही अडीच ते तीन टक्के असेल असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात ती अंदाजापेक्षा जास्त म्हणजे ५ टक्के असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा आता ५००च्या जवळ पोहचला आहे. आतापर्यंत मुंबईत कोरोनाचे ४९० रुग्ण झाले असून ३४ मृत्यू झाले आहेत. मुंबईत मृत्युचं प्रमाण ७ टक्क्यांच्या जवळपास आहे.

कोरोना व्हायरसवर अजूनही औषध तयार झालेलं नाही. असं असलं तरी कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही चांगलं आहे. विशेषतः प्रतिकारशक्ती चांगली असलेले रुग्ण कोरोनाच्या विषाणूचा सामना करून बरे होतात. तर वृद्ध आणि मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असा आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाचा धोका अधिक असतो. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या मृतांचं प्रमाण वेगवेगळ्या देशात वेगवेगळं आहे.

चीनमध्येही सुरुवातीला कोरोनाच्या रुग्णांच्या मृतांचं प्रमाण अडीच ते तीन टक्के होतं. नंतर ते चार टक्क्यांच्या वर गेलं. इटलीमध्ये कोरोनाच्या मृतांचं प्रमाण तब्बल १२ टक्क्यांच्या वर आहे. ब्रिटनमध्यही मृतांचं प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर स्पेनमध्ये हे प्रमाण साडेनऊ टक्के आहे.

अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ३६ हजारावर असून ९६२० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांच्या तुलनेत मृतांचं प्रमाण २.८ टक्के असलं तरी अमेरिकेत एक लाखांवर बळी जातील, असा अंदाज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच वर्तवला आहे. त्यामुळे वेळीच नियंत्रण मिळवण्यात अपयश आलं तर मृतांचं प्रमाण वाढू शकतं.

जर्मनीमध्ये मात्र एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण असले तरी या देशात मृत्युचं प्रमाण दीड टक्क्याच्या आसपास आहे. गेले आठ दिवस तिथं रोज शंभरावर मृत्यू होत आहेत. मात्र ही संख्या अन्य देशांच्या तुलनेत कमी आहे.

नेदरलँडसारख्या देशातही रुग्णांची संख्या वाढत असून मृतांचा आकडाही वाढत आहे. नेदरलँडमध्ये १८ हजारावर रुग्ण असून १८०० वर मृत्यू झाले आहेत. त्यामुळे तिथे कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण १० टक्के इतकं आहे. तर ३७०० हून अधिक बळी गेलेल्या इराणमध्ये मृत्यूचं प्रमाण ६ टक्क्यांहून अधिक आहे.

 

जगभरात १२ लाख ८७ हजारांवर रुग्णसंख्या पोहचली असून मृतांचा आकडा ७० हजारावर गेला आहे. त्यामुळे जगभरातलं मृतांचं प्रमाण सुमारे ५.५ टक्क्यांच्या आसपास आहे.

भारतातही हळूहळू रुग्णांची संख्या वाढत असताना मृतांचं प्रमाणही वाढत आहे. ही सरकारपुढे चिंतेची बाब असून हे प्रमाण रोखणं हे आरोग्य यंत्रणेसमोरचं आव्हान आहे.