पालिकेला 'खड्डे दाखवत' मुंबईकरांची बक्कळ कमाई, पण...

खड्डे बुजवण्यातलं अपयश पाहून 'खड्डे दाखवा पैसे मिळवा' ही योजना ९ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली

Updated: Nov 15, 2019, 01:41 PM IST
पालिकेला 'खड्डे दाखवत' मुंबईकरांची बक्कळ कमाई, पण...  title=

बागेश्री कानडे, झी २४ तास, मुंबई : खड्डे दाखवा, पाचशे रुपये मिळवा अशी योजना मुंबई महापालिकेनं सुरु केली... आणि 'झी २४ तास'नंच महापालिकेला पहिला दणका दिला. आमच्या प्रतिनिधी बागेश्री कानडे यांनी खड्डा दाखवला आणि ५०० रुपये मिळवले.... आता हे तुम्हीही करू शकता.  

मुंबईकरांना सध्या उत्पन्नाचं नवं साधन मिळालंय, हे साधन आहे खड्डे शोधून पैसे कमावण्याचं... मुंबई महापालिकेनं खड्डा दाखवा आणि तो बुजवला नाहीतर पाचशे रुपये कमवा अशी योजना सुरू केली. महापालिकेनं सुरुवातीला अॅपवर जे फोटो अपलोड झाले ते खड्डे बुजवण्याची तत्परता दाखवली. पण जे खड्डे उरले त्यांचे पैसे तक्रार करणाऱ्या पालिकेला मुंबईकरांना द्यावे लागले. आतापर्यंत केवळ दादर-धारावी भागात खड्डे दाखवणाऱ्यांना साडे आठ हजार रुपये देण्यात आलेत.

'झी २४ तास'च्या प्रतिनिधीनं दाखवलेला खड्डाही बुजवला गेला नाही. त्याचेही ५०० रुपये 'झी २४ तास'च्या प्रतिनिधीला मिळाले.

अभियंत्यांच्या पगारातून पैसे कापून...

परंतु, ज्या विभागातले खड्डे बुजवता आले नाहीत त्याचे पैसे संबंधित अभियंत्याच्या पगारातून कापण्यात आलेत. हे कळाल्यानंतर काही तक्रारदारांनी पैसे परत करणार असल्याचं सांगितलंय.

'ऍपबद्दल माझ्या काही शंका होत्या त्याची उत्तरं मिळाली... पण, इंजिनिअर्सच्या पगारातून ही रक्कम कापली जाणार असल्याचं कळालं तेव्हा धक्का बसला... असं असेल तर मला ते पैसे नकोत असं मी त्यांना सांगितल्याचं' प्रसाद केणी या तक्रारदारानं म्हटलंय. 

खड्डे बुजवण्यातलं अपयश पाहून खड्डे दाखवा पैसे मिळवा ही योजना ९ नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली. खड्डे बुजवण्याचं आव्हान सहज पेलू शकू असा आत्मविश्वास असलेले आयुक्तांची मात्र या बक्षीस योजनेमुळं चांगलीच पंचाईत झालीय.