भाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोल

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईतील होर्डींग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचे संरक्षण आहे असा आरोप करत  राज्य सरकार आणि मुबंई महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कारवाई करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश म्हणजे 'वरातीमून घोडे' असल्याची टीकाही काँग्रेसने केलीय.  

राजीव कासले | Updated: May 14, 2024, 06:00 PM IST
भाजपा-शिंदे सरकार दुर्घटना होण्याची वाट पहाते का? अनधिकृत होर्डिगवर कारवाई का केली नाही? काँग्रेसचा हल्लाबोल title=

Ghatkopar Hording Collapsed : मुंबईतील घाटकोपर पंतनगर भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय. 74 जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या (NDRF) टीमला यश आलंय. सोमवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसात घाटकोपरमधल्या पेट्रोल पंपावर होर्डिंग (Ghatkopar Hording Collapsed) कोसळलं. जखमींवर राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. दरम्यान, मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे बीएमसी प्रशासन आणि राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत असा हल्लाबोल काँग्रेसने (Congress) केलाय.

मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डींग माफियांना भाजपा-शिंदे-अजित पवार सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप करत या घटनेप्रकरणी राज्य सरकार तसंच मुंबई महानगरपालिकेवरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

घाटकोपरमधील होर्डींग दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू तर जवळपास 88 जण जखमी झाल्याची दुर्घटना अत्यंत वेदनादायी आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. ही रक्कम वाढवून दिली पाहिजे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेने केला पाहिजे अशी मागणीही नाना पटोले यांनी केली आहे.  राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, कमशिनच्या हव्यासातून मुंबई शहर बकाल केलं आहे. घाटकोपरमधील होर्डींग हे एक उदाहरण आहे, अशी हजारो होर्डींग अनधिकृत रितीने शहरभर झळकत आहेत, असा आरोपही नाना पटोले यांनी केलाय.

मुंबई महानगर पालिका, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाचे आशिर्वाद असल्याशिवाय असे अनधिकृत होर्डींग लावले जावू शकत नाहीत. घाटकोपरच्या होर्डींगला कोणी परवानगी दिली होती, त्यामागे कोणत्या राजकीय नेत्याची शिफारस होती का, या सर्वांची सखोल चौकशी करून खऱ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कारवाईच्या नावाखाली कोणाला तरी बळीचा बकरा करुन महाभ्रष्ट युती सरकार आपली सुटका करुन घेऊ शकत नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय.

अवैध होर्डींग असो वा मोडकळीस आलेल्या इमारती, महानगरपालिका फक्त नोटीस पाठवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करत असते आणि दुर्घटना झाल्यानंतर थातूर मातूर कारवाई केली जाते. मागील दोन वर्षांपासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरु आहे. सत्ताधारी पक्षाचे दोन पालकमंत्री महापालिकेच्या कार्यालयात स्वतःची कार्यालये थाटून बसले आहेत. हे दोन्ही पालकमंत्री काय झोपा काढत होते का? का बीएमसीच्या कार्यालयातून फक्त वसुलीचे काम करत होते? आता दुर्घटना झाल्यानंतर जबाबदारी झटकून दुसऱ्यांवर आरोप करण्याची नौटंकी भाजपा नेते करत आहेत, असा आरोपही नाना पटोले यांनी केलाय.