दुर्देवी! दहिहंडीत जखमी झालेल्या 'त्या' गोविंदाची मृत्यूशी अपयशी झुंज, घेतला अखेरचा श्वास

दहीहंडीत जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू, एक महिन्यापासून सुरु होते उपचार

Updated: Oct 8, 2022, 03:04 PM IST
दुर्देवी! दहिहंडीत जखमी झालेल्या 'त्या' गोविंदाची मृत्यूशी अपयशी झुंज, घेतला अखेरचा श्वास title=

मुंबई : दहीहंडी उत्सवात (Dahihandi 2022) गंभीर जखमी झालेल्या करीरोड इथल्या गोविंदाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. गेल्या एक महिन्यापासून केईएम रुग्णालायत उपचार घेणाऱ्या प्रथमेश सावंत (Prathamesh Sawant) याचा आज मृत्यू झाला. उपचारांतून बरा होऊन प्रथमेश पुन्हा आपल्यात येईल अशी आशा त्याचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार बाळगून होता. त्यासाठी ते प्रार्थनाही करत होते.

उपचारादरम्यान प्रथमेशला न्युमोनिया झाला होता, त्यादरम्यान आज त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. प्रथमेश अवघ्या वीस वर्षांचा होता. याआधी थरावरुन कोसळलेल्या संदेश दळवी या तरुणाचा मृत्यू झाला होता.

कोरोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष कोणतेच सण साजरे करण्यात आले नव्हते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने सर्व सणांवरचे निर्बंध उठवले. त्यामुळे गणेशोत्सवाबरोबरच राज्यात दहिहंडिचा उत्सवही जल्लोषात साजरा झाला. पण यात काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. करीरोड इथल्या साईभक्त क्रीडा मंडळातील गोविंदा प्रथमेश सावंतही जखमी झाला होता. वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. पण गेले महिनाभर सुरु असलेली त्याची मृत्यूशी झुंज अखेर आज संपली.

प्रथमेश लहान असताना त्याच्या आईचं कॅन्सरने निधन झालं होतं. त्याचे वडिल आणि बहिणीचं एका आजाराने निधन झालं. प्रथमेशचा सांभाळ त्याचे चुलते करत होते. शिक्षण घेताघेताच तो डिलिव्हरी बॉयचही काम करत होता. 

संदेश दळवीचं निधन
याआधी विलेपार्ले इथल्या गोविंदा पथकातील संदेश दळवी या तरुणाचं निधन झालं होतं. वरच्या थरावरुन पडून संदेश जखमी झाला होता, त्याच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.