'केवळ स्टेशनची नावं बदलून उपयोग नाही, आधी लोकल प्रवाशांना...'; मनसेचा खोचक सल्ला

Mumbai Local Train Station Name Changed: मुंबईमधील रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारने मान्य केला असून यावरुन मनसेनं टोला लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 14, 2024, 10:59 AM IST
'केवळ स्टेशनची नावं बदलून उपयोग नाही, आधी लोकल प्रवाशांना...'; मनसेचा खोचक सल्ला title=
राज्य मंत्रीमंडळाने नामांतरणाला दिला हिरवा झेंडा

Mumbai Local Train Station Name Changed: मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गावरील 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्यास राज्य मंत्रीमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. मध्य रेल्वेवरील 2, पश्चिम रेल्वेच्या मार्गावरील 2 आणि हार्बरच्या मार्गावरील 4 स्थानकांची नावं बदलण्यात आली आहेत. मात्र या नामांतरणावरुन राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं टोला लगावला आहे. मनसेचे एकमेव आमदार प्रमोद पाटील यांनी रेल्वे स्थानकाच्या नामांतरणावरुन खोचक टीका केली आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार असलेल्या पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना कल्याण मतदारसंघांबरोबरच रेल्वेसंदर्भातील समस्यांवर भाष्य केलं.

किती खासदार लोकल ट्रेनच्या समस्येबदद्ल बोलले?

कल्याण ग्रामीण मतदारसंघात 26 कोटी 50 लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ प्रमोद पाटील यांनी केलं. या उद्घाटन सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबद्दल भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील लोकांना लोकल ट्रेनसंदर्भातील अनेक समस्या असल्याचा उल्लेख प्रमोद पाटील यांनी आवर्जून केला. येथून लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्या भेडसावतात. या समस्या सोडवण्यासाठी कोणी पुढाकार घेतलेला नाही, असं प्रमोद पाटील म्हणाले. तसेच सर्वच खासदारांकडून लोकल ट्रेनच्या प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा इशारा देत प्रमोद पाटील यांनी टीका केली. आतापर्यंत किती खासदारांनी लोकल प्रवाशांच्या समस्या मार्गी लावल्या? असा प्रश्न प्रमोद पाटील यांनी विचारला. तसेच पुढे बोलताना "केवळ रेल्वे स्थानकांची नावे बदलून उपयोग नाही. आधी लोकल प्रवाशांना सुखकारक प्रवास करता येईल या दृष्टीने सरकारने प्रयत्न केले पाहिजेत" असं मनसे आमदाराने म्हटलं.

सर्वसामान्यांना अनेक समस्या

प्रमोद पाटील यांच्या विधानसभेचा मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतो तेथील समस्यांबद्दलही त्यांनी भाष्य केलं. कल्याण लोकसभा मतदारसंघातील मोठा वर्ग नाराज आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत अनेक विकास कामे, नागरी समस्यांसंदर्भातील प्रश्न मार्गी लागलेले नाहीत, असं प्रमोद पाटील म्हणाले. मागील 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या विद्यमान सरकारच्या विरोधात नाराजीचे वातावरण असल्याचा दावा प्रमोद पाटील यांनी केला. बेरोजगारी, महागाईबरोबर अन्य अनेक कारणांमुळे लोकांमध्ये नाराजी आहे. या नाराजीचा फटका येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत बसेल. उमेदवार सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षातील असो त्यांना हा फटका बसणार आहे, असे आमदार प्रमोद पाटील यांनी सांगितले.

नक्की वाचा >> राजीनाम्यानंतर राज ठाकरेंचा फोन आला पण मी कॉल उचलला नाही कारण...; वसंत मोरेंचा खुलासा

मुख्यमंत्र्यांच्या मुलाला सूचक इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिदेंचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांना सूचक शब्दांमध्ये प्रमोद पाटील यांनी इशारा दिला आहे. कल्याण लोकसभेच्या कोणत्याही उमेदवाराला मोठ्या मताधिक्याचा दावा करता येणार नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे. विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे असो किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार असला तरी त्यांना मोठ्या मताधिक्याचा दावा करता येणार नाही. या मतदारसंघातील उमेदवार हा काठावरच पास होईल, असं प्रमोद पाटील म्हणाले आहेत. 

मुंबईतील स्टेशनची बदललेली नावं

करी रोड - लालबाग
मरीन लाइन्स - मुंबादेवी
चर्नी रोड- गिरगाव
सॅन्डहर्स्ट रोड - डोंगरी
कॉटन ग्रीन - काळाचौकी
ग्रँट रोड - गावदेवी
किंग सर्कल - तीर्थकर पार्श्वनाथ
डॉकयार्ड - माझगाव