डिझेलच्या जनरेटवर रुग्णालयात वीज पुरवठा करण्याची कसरत

डिझेलच्या जनरेटरवर रुग्णालयाचा वीज पुरवठा 

Updated: Oct 12, 2020, 04:48 PM IST
डिझेलच्या जनरेटवर रुग्णालयात वीज पुरवठा करण्याची कसरत  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील वीज पुरवठा दीर्घ काळासाठी खंडित झाल्याने खाजगी रुग्णालयांना रूग्णालये सुरू ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. डिझेलच्या जनरेटरवर रुग्णालयाचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र बराच काळ वीज येणार नसल्याने काही रूग्णालयांनी थेट वसई, विरार इथून डिझेल आणले आणि रुग्णांची काळजी घेतली.

बोरीवली पश्चिमेला असलेले हे फिनिक्स हॉस्पिटलमध्ये सध्या कोविड रुग्णांवर इथे उपचार सुरू आहेत. इथले आयसीयू बेड भरलेले आहेत तर काही रुग्ण व्हेटिंलेटरवर आहेत. मुंबईतील वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने या रुग्णालयाने जनरेटरवर रूग्णालयातील वीज सुरू केली. मात्र बराच काळ वीज येणार नसल्याचे लक्षात आल्याने जनरेटरसाठी आणखी डिझेलची गरज होती. मुंबईतील वीज पुरवठा बंद असल्याने इथले पेट्रोलपंपही बंद होते. त्यामुळे या रुग्णालयाने थेट वसई, विरारहून डिझेलचा अतिरिक्त साठा मागवला गेला.  

दुसरीकडे फिनिक्स हॉस्पिटलचा वीज पुरवठा जवळपास तीन तास बंद होता. आणखी काही तास वीज आली नसती तरी जनरेटरवर रुग्णालय सुरू ठेवण्याची तयारी फिनिक्स हॉस्पिटलने ठेवली होती. मुंबईतील इतर रुग्णालयांनीही रुग्णालयाचा वीज पुरवठा इतर माध्यमातून सुरू ठेवून रुग्णांची काळजी घेतल्याचे फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक सौरभ सांगोरे यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. 

सोमवारी सकाळच्या सुमारास आठवड्याची सुरुवात झालेली असतानाच आणि ऐन कार्यालयीन कामांना वेग आलेला असतानाच संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. अचानक मुंबई शहरात वीज गेल्यामुळं अनेक कामांमध्ये अडथळे आल्याचं पाहायला मिळालं. पुन्हा रुळावर येणाऱ्या रेल्वे सेवेवरही याचा थेट परिणाम झाला आहे. 

ग्रीड फेल झाल्यामुळं वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर येत आहे. मुख्य मुंबई शहरासह पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईतही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. परिणामी मागील काही वेळापासून वेग पकडलेलं हे शहर पुन्हा एकदा थांबलं. 

अति उच्चदाब वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने वीजपुरवठा बंद झाल्याने मुंबई उपनगरांमध्ये मुलुंड , भांडुप, नाहूर , कांजुर , विक्रोळी , आणि घाटकोपरच्या काही भागांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईच्या रस्त्यावरील सिग्नल बंद झाले आहेत. शिवाय मुंबईच्या वाहतुकीवर नजर असणारी सीसीटीव्ही यंत्रणा ही बंद झाली होती.

महापारेषणच्या ४०० KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट १ देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट २ वर होता. मात्र सर्किट २ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे.