आंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक

मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. 

Updated: Apr 13, 2024, 03:49 PM IST
आंबेडकर जयंतीला मुंबई लोकलचा मेगाब्लॉक नको, शिवसेनेची मागणी; पाहा कसं असेल संपूर्ण वेळापत्रक title=

Mumbai Railways 14 April Megablock : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त रविवारी (14 एप्रिल) छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आंबेडकरी अनुयायांचा महासागर उसळणार आहे. पण उद्या दोन्ही लोकल रेल्वेवर मेगाब्लॉक नियोजित करण्यात आला आहे. यामुळे आंबेडकरी जनतेची गैरसोय होणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी महामानवास अभिवादन करण्यासाठी अनुयायी दाखल होत असतात. पण उद्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विविध मार्गांवर रविवारी अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे महामानवास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांचे गैरसोय होऊ शकते. यामुळे  शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे शिवसेना नेते, सचिव अनिल देसाई यांनी हा मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली आहे. याबद्दल त्यांनी दोन्ही रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्रही दिले आहे. 

मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकलवर येत्या रविवारी (14 एप्रिल) मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

पाहा कसा असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वे :

सकाळी 11.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.43 ते दुपारी 3.44 पर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी/सेमी जलद सेवा मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी 10.36 ते दुपारी 3.51 या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या/सेमी जलद सेवा कल्याण ते मुलुंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील, पुढे अप धीमी सेवा डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. व पुन्हा मुलुंड येथे वेळापत्रकाच्या 10 मिनिटे उशिराने पोहोचेल. ठाणे लोकल डाऊन धीम्या मार्गावर धावतील. सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाऊन सेवा वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिरा पोहोचतील/निघतील.

डाउन धीम्या मार्गावर

ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 09.53 वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.05 वाजता सुटणार आहे.

अप धीम्या मार्गावर 

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण लोकल असेल जी कल्याण येथून सकाळी 10.25 वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतरची पहिली लोकल परळ लोकल ही ठाणे येथून दुपारी 04.17 वाजता सुटेल.

हार्बर रेल्वे : 

सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत कुर्ला व वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल/बेलापूर/वाशीसाठी सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला व पनवेल – वाशी या दरम्यान विशेष उपनगरीय गाड्या धावतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

डाउन हार्बर मार्गावर 

ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल पनवेल लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.18 वाजता सुटेल.
ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी 3.44 वाजता सुटेल.

अप हार्बर मार्गावर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सकाळी 10.05 वाजता पनवेल येथून सुटणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी 3.45 वाजता पनवेल येथून सुटणार आहे.