Mumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा... मध्य मार्गावर 'मेगाब्लॉक'

Railway Mega Block: आज व्हॅलेंटाइन वीकचे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी मुंबई लोकलचे वेळापत्रक बघा. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. 

Updated: Feb 12, 2023, 06:52 AM IST
Mumbai Railway Mega Block : मुंबईकरांनो आज घराबाहेर पडत असाल तर ही बातमी नक्की वाचा... मध्य मार्गावर 'मेगाब्लॉक'   title=

Railway Mega Block:  मुंबईकरांनो (Mumbai) आज घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा. कारण आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक (Central Railway Mega Block) घेण्यात येणार आहे.  नियमित देखभाल दुरस्ती आणि अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेनं मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत लोकल पूर्णपणे बंद राहणार असून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक उशिरानं धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या (Central Railway) वतीनं देण्यात आली आहे.    

विद्याविहार आणि ठाणे मेगाब्लॉक

रेल्वेचा मेगाब्लॉक मध्य मार्गावरील विद्याविहार आणि ठाणे दरम्यान 5वी आणि 6वी मार्गावर सकाळी 11.00 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत घेण्यात येणारआ आहे. परिणामी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येणार्‍या मेल/एक्स्प्रेस गाड्या कल्याण ते ठाणे दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. यामुळे मेल/एक्स्प्रेस 10 ते 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत. यामध्ये 12168 बनारस- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्स्प्रेस, 12142 पाटलीपुत्र- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11014 कोईम्बतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12294 प्रयागराज- लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्सप्रेस, 11080 गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11061 छाप्रा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 12164 चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस,  12162 आग्रा कॅंटॉंमेंट - लोकमान्य टिळक टर्मिनस लष्कर एक्सप्रेस उशीराने धावणार आहेत. 

या मेल/एक्स्प्रेस उशीराने धावतील 

तर लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे आणि कल्याण दरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. यापण मेल/एक्स्प्रेस 10 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. यामध्ये 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर गोदान एक्स्प्रेस, 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस -जयनगर एक्स्प्रेस, 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवानंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस, 17222 लोकमान्य टिळक टर्मिनस - काकीनाडा एक्स्प्रेस, 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस- पटना एक्स्प्रेस, 12619 लोकमान्य टिळक टर्मिनस -मंगळुरू एक्स्प्रेस उशीराने धावणार आहेत. 

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक 

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहेत. दरम्यान पनवेल येथून 10.33 ते 15.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून  09.45 ते 15.12 वाजेपर्यंत  पनवेल/बेलापूर करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील.

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल

तसंच पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 03.53 वाजेपर्यंत  ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि सकाळी 10.01 ते दुपारी 03.20 वाजेपर्यंत ठाणे येथून पनवेलकडे जाणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल बंद राहतील.
 
ब्लॉकदरम्यान बेलापूर आणि खारकोपर लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील. तर  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.