आघाडीत बिघाडी? 'या' कारणाने नाना पटोले यांची राष्ट्रवादीविरोधात थेट हायकमांडकडे तक्रार

राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत नाना पटोलेंची थेट हायकमांडकडे तक्रार

Updated: May 16, 2022, 02:17 PM IST
आघाडीत बिघाडी? 'या' कारणाने नाना पटोले यांची राष्ट्रवादीविरोधात थेट हायकमांडकडे तक्रार title=

Maharashtra Politics : काँग्रेसला कमजोर करत भाजपला बळ देण्याचं काम राष्ट्रवादी (ncp) करतेय असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. नाना पटोले यांनी राष्ट्रवादीची थेट हायकमांड सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे तक्रार केलीय.  गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने पद्धतशीरपणे काँग्रेस संपवायला घेतलीय अशी तक्रार त्यांनी केलीय. येणाऱ्या काही दिवसांत तुम्हाला याचे परिणाम दिसतील असं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय. 

गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादीने काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत नेलं. भिवंडीत पक्ष फोडण्याचं काम केलं. भंडारा आणि गोंदियात भाजपसोबत युती करत राष्ट्रवादीने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला असा आरोप नाना पटोले यांनी केला. 

सरकारमध्ये सोबत असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसला अडचणीत आणतंय असं आरोप करत नाना पटोले यांनी याची तक्रार सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. सोनिया गांधी यांनी तक्रार ऐकून घेतली असून येणाऱ्या काळात त्याचे परिणाम दिसतील असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. 

राज्यात पक्षांतर्गत निवडणुकीचे संकेत देत नाना पटोले यांनी राज्यात फेरबदल होणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. राज्यात फेरबदल करणं हा हायकमांडचा निर्णय असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलं. तसंच भाजपला पर्यात काँग्रेसच असल्याचंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं. 

केंद्र सरकारचं अपयश लपवण्यासाठी भोंग्यांचा मुद्दा पुढे केल जात असून बाबरी मशीद कुणी पाडलीय या वादात आम्ही जात नाही, आम्ही बांधणाऱ्यांमध्ये आहोत असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.