बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींकडून अभिवादन

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे.

Updated: Jan 23, 2019, 09:08 AM IST
बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींकडून अभिवादन title=

मुंबई -  शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केले आहे. सामान्य नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या भल्यासाठी बाळासाहेब कायमच आग्रही होते. तल्लख बुद्धिमत्तेचे वरदान त्यांना लाभले होते. त्यांच्या वक्तृत्व कौशल्यामुळे लाखो लोकांना अदभूत अनुभूती येत होती, या शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बुधवारी सकाळीच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हे ट्विट करीत बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले.

मुंबईतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. मुंबई महानगर विकास प्राधिकारणच्या (एमएमआरडीए) माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबईतील महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वीच हा बंगला रिकामा करण्यात आला. स्मारकाच्या भूमिपूजनासाठी नरेंद्र मोदी मुंबईत येणार अशी चर्चा होती. पण शिवसेनेच्या आक्षेपांमुळे नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला येणार नाहीत. त्यांचा प्रस्तावित दौरा रद्द करण्यात आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेशी युती व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. दोन्ही पक्षांमध्ये युतीबाबत बोलणी सुरू असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. यातच शिवसेनेची मर्जी राखण्यासाठीच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय राज्य सरकारने लवकर मार्गी लावला आहे. यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असून, या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यात येणार असल्याचेही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरविण्यात आले.