पशुसंवर्धन खात्याच्या बोगस कारभारावर विरोधक भडकले

दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत सांगितलं. 

Updated: Feb 28, 2018, 06:36 PM IST
पशुसंवर्धन खात्याच्या बोगस कारभारावर विरोधक भडकले title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : लाळ्या खुरकूत रोगाच्या निविदा प्रक्रियेत दिरंगाई प्रकरणाची एक महिन्याच्या आत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत सांगितलं. 

चौकशीची ग्वाही

या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र अद्याप चौकशी सुरू झाली नसल्याची कबुली खोतकर यांनी सभागृहात दिली.

विरोधकांची सरकावर जोरदार टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि एकनाथ खडसे यांनी याप्रकरणी सरकारला धारेवर धरलं. हरियाणातील बोगस लस पुरवणा-या बायोवेट कंपनीला हे कंत्राट देण्याचा घाट पशुसंवर्धन खात्यानं घातल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. हा मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार असून राज्यातील दोन कोटी जनावरांच्या जीवाशी हा खेळ सुरू असल्याचं पवार यांनी सांगीतलं. लाळ्या खुरकूत रोगाच्या लस खरेदीचा गोंधळ झी २४ तासनं सर्वात आधी उजेडात आणला होता.

अजित पवार भडकले

पशुसंवर्धन आयुक्त यांनी सचिवांचे आदेश या प्रकरणात मानले नाहीत. सचिव मोठे की आयुक्त? काय चाललंय हे? मुक्या जनावरांचा तळतळाट लागेल, वाटोळं होईल तुमचं. (शिवसेना मंत्री अर्जून खोतकर यांना) तुम्ही सत्याची बाजू घ्या, सत्तेची नाही, उद्धव ठाकरेंनी तुम्हाला हेच सांगितले आहे ना... २ कोटी १० लाख जनावरांच्या लसीकरणाचा कार्यक्रम वर्षातून दोन वेळा होतो, पण यावेळी ही लस चुकली आहे. कमिशन न मिळाल्यामुळे सात वेळा निविदा काढण्यात आल्या. यात एका मोठ्या माणसाचा सहभाग आहे. 

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

इंडियन इमॉलॉजी कंपनीच्या तक्रारी नसताना त्या कंपनीबाबत खोट्या तक्रारी समोर आणल्या.  ज्या कंपनीविरोधात गंभीर तक्रारी होत्या त्यांना लस पुरवण्याचे कंत्राट देण्याचा घाट घातला गेलाय.