पितृपक्ष चांगला की वाईट?

  बुधवार ६ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात अशी लोकांची श्रद्धा असते. पितृपक्षातील  हे पंधरा दिवस वाईट व अशुभ असतात असा काही लोकांना समज असतो.

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Sep 6, 2017, 04:03 PM IST
पितृपक्ष चांगला की वाईट?  title=

मुंबई :  बुधवार ६ सप्टेंबरपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. भाद्रपद कृष्ण पक्षाला पितृपक्ष असे म्हणतात. पितृपक्षात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात अशी लोकांची श्रद्धा असते. पितृपक्षातील  हे पंधरा दिवस वाईट व अशुभ असतात असा काही लोकांना समज असतो.

असे लोक या दिवसात सोने, घर वगैरे मौल्यवान वस्तूंची खरेदी करीत नाहीत तसेच विवाह विषयक बोलणीही करीत नाहीत. परंतु या सर्व चुकीच्या समजुती आहेत असे पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. या विषयी बोलतांना श्री. दा. कृ. सोमण म्हणाले की, जर आपले पूर्वज या दिवसात पृथ्वीवर येतात अशी श्रद्धा असेल तर या दिवसात करीत असलेल्या गोष्टींना पूर्वजांचा आशीर्वादच मिळेल नाही का? पूर्वजांचा आशीर्वाद ही गोष्ट वाईट कशी असू शकेल? ज्यांनी आपणास जन्म दिला, शिक्षण दिले, घर किंवा जमीन जुमला ठेवला अशा पूर्वजाना आपण पितृपक्षातील या दिवसात श्रद्धांजली वाहत असतो हे सर्व वाईट- अशुभ कसे असू शकेल असा प्रश्नही श्री. सोमण यांनी केला. 

पितृपक्षात कोणत्याही नव्या वा शुभ कामाला सुरुवात करू नये अशी एक समाजमान्यता आहे. त्यामुळे घेतल्या कामाला यश मिळणार नाही. अशीही अनेकांची समजूत असते. अनेकांच्या दृष्टीकोनातून हा काळ आपल्या स्वर्गस्थ पितरांची आठवण जागवण्याचा, त्यांना जेऊ खाऊ घालण्याचाही हा काळ असतो. त्यामुळे या काळात कोणत्याही नव्या गोष्टींच्या घोषणा अभावानेच केल्या जातात. 

तसेच अनेक लोकं या दिवसांत लग्नांची बोलणी, खरेदी देखील करणं टाळतात. त्याचप्रमाणे मराठी आणि हिंदी सिनेमांची चर्चा देखील होत नाही. त्यामुळे या दिवसांत नव्या गोष्टी करताना सहसा या दिवसांना टाळून साऱ्या गोष्टी केल्या जातात. मात्र आता खगोल शास्त्रज्ञ दा कृ सोमण यांनी सांगितल्यामुळे आता लोकं निश्चित झाली आहेत.