राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर

राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत.  

Updated: Aug 7, 2019, 01:08 PM IST
राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर title=
संग्रहित छाया

मुंबई : राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रूग्णसेवेवर या परिणाम जाणवत आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती आहे. त्यामुळे तेथे रोग पसरु शकतात, अशा अवस्थेत डॉक्टरांनी संप करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

राज्य शासनाकडून डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. तसेच अनेक  समस्या सोडविण्यात येत नाहीत, असा आरोप करत निवासी डॉक्टर आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपावर जाण्याचा निर्णय डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने घेतला आहे. डॉक्टरांनी आता आपत्कालीन वैद्यकीय सेवाही बंद करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, हा संप बेकायदा आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. सध्या राज्यात साथीच्या आजारात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळे रोगराई पसरु शकते, अशावेळी हा संप करणे अयोग्य आहे, असेही बोलले जात आहे.

राज्य शासन वारंवार डॉक्टरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अजून किती काळ केवळ आश्‍वासनांवर विश्‍वास ठेवायचा, असा प्रश्‍न आमच्यासमोर आहे. त्यामुळे आता शासनासमोर संपाचे हत्यार उगारण्याशिवाय पर्याय नाही. मागण्या मान्य होईपर्यंत राज्यातील निवासी डॉक्टर सेवेत हजेरी लावणार नाहीत, असे मार्ड संघटनेने काढलेल्या निवेदनात म्हटले आहे.

डॉक्टरांना स्टायपेंड वेळेवर मिळाला पाहिजे. अकोला, आंबेजोगाई, लातूर, नागपूर या सरकारी मेडिकल कॉलेजेसमध्ये अनेकदा स्टायपेंड वेळेवर मिळत नाही. निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये वाढ व्हावी. केंद्र सरकारच्या इंस्टिट्युटमध्ये निवासी डॉक्टरांना जितका स्टायपेंड देण्यात येतो तितका आम्हाला देखील मिळाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे, केंद्रीय मार्डने आपल्या निवेदनात म्हटले आहे.