'आम्ही युतीमध्ये लढलोय, सरकारही एकत्रच स्थापन करू'

निकाल लागल्यानंतर भविष्यातील राजकीय गणिते ही उद्धव ठाकरे हेच ठरवतील.

Updated: Oct 22, 2019, 05:21 PM IST
'आम्ही युतीमध्ये लढलोय, सरकारही एकत्रच स्थापन करू' title=

मुंबई: शिवसेना आणि भाजपने युती करून विधानसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे निकालानंतर आम्ही एकत्रितपणे सरकार स्थापन करू, असे शिवसेना नेते अनिल परब यांनी सांगितले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सोमवारी जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचण्यांसंदर्भात (एक्झिट पोल) भाष्य केले. 

एक्झिट पोलचे निकाल काहीही असोत पण आता सर्व पेटीत बंद आहे. निकाल लागल्यावर यावर चर्चा करता येईल. शिवसेनेविरोधात सर्वाधिक भाजप बंडखोर उभे करणे किंवा भाजपकडून विरोधकांना अंतर्गत मदत झाल्याच्या चर्चा आम्ही कार्यकर्त्यांकडून ऐकल्या आहेत. आम्ही ही माहिती सध्या तपासून घेत असल्याचे अनिल परब यांनी म्हटले.

'भाजप स्वबळावर सत्तेत येईल; शिवसेनेला ५५ पेक्षा अधिक जागा मिळणार नाहीत'

तसेच निकाल लागल्यानंतर भविष्यातील राजकीय गणिते ही उद्धव ठाकरे हेच ठरवतील. आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवली आहे. आतापर्यंत आमच्या मनात कपट नाही. त्यामुळे आम्ही निकालानंतर एकत्रितपणे सरकार स्थापन करू, असे अनिल परब यांनी सांगितले. 

दरम्यान, सोमवारी मतदान पार पडल्यानंतर 'झी २४ तास' आणि 'पोल डायरी'ने जाहीर केलेल्या एक्झिट पोलमध्ये शिवसेनेला २०१४ पेक्षा कमी जागा मिळणार असल्याची शक्यता समोर आली होती. गेल्या निवडणुकीत ६३ जागांवर जिंकलेल्या शिवसेनेची ५५ जागांपर्यंत घसरण होऊ शकते. ही शक्यता खरी ठरल्यास भाजपकडून लहान भाऊ म्हणून हिणवण्यात येणाऱ्या शिवसेनेवर नामुष्कीची वेळ ओढावेल. एक्झिट पोलची आकडेवारी पाहता आता महायुतीमधील शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी होण्याची शक्यता आहे.

'महाराष्ट्राची इच्छा असेल तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील'