दाभोलकर-पानसरेंचे मारेकरी सापडत नसतील तर एकट्या मुख्यमंत्र्यांचा काय दोष?- शिवसेना

उद्धव ठाकरे शनिवारी अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरला जाणार आहेत.

Updated: Mar 30, 2019, 08:05 AM IST
दाभोलकर-पानसरेंचे मारेकरी सापडत नसतील तर एकट्या मुख्यमंत्र्यांचा काय दोष?- शिवसेना  title=

मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा झाल्या दिवसापासून शिवसेनेचा भाजपविरोधातील सूर कमालीचा मवाळ झाला आहे. युती होण्यापूर्वी शिवसेना भाजपवर कुरघोडी किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नसे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तील अग्रलेखांमधून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर अक्षरश: आगपाखड व्हायची. यावरून भाजपमधील अनेक नेते नाराजही झाले होते. मात्र, आता युती झाल्यानंतर शिवसेनेचे वेगाने होत असलेले मनपरिवर्तन पाहून राजकीय वर्तुळातील अनेकजण तोंडात बोटे घालत आहे. 

दाभोलकर-पानसरे प्रकरणी उच्च न्यायालयाचे मुख्यमंत्र्यांना खडे बोल

नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात आलेल्या अपयशावरून उच्च न्यायालयाने नुकतीच मुख्यमंत्र्यांची कानउघडणी केली होती. मात्र, दाभोलकर व पानसरेंचे मारेकरी सापडत नसतील तर एकट्या मुख्यमंत्र्यांना का जबाबदार धरता, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने फडणवीसांची बाजू उचलून धरली आहे. 'सामना'तील या अग्रलेखात न्याय प्रक्रियेतील दिरंगाईबद्दलही अप्रत्यक्षपणे भाष्य करण्यात आलेय. फक्त पानसरे-दाभोलकरच नाहीत, तर लाखो गरीब आजही न्यायापासून वंचित आहेत व कोर्टाच्या पायऱया झिजवून त्यांचे आयुष्य संपले. पण त्यांना न्याय काही मिळाला नाही. मात्र म्हणून आमची न्यायालये बधिर किंवा अकार्यक्षम आहेत असा आरोप आम्ही करणार नाही. गरीबांना न्याय मिळत नाही व अनेकांना न्याय विकत मिळतो या भ्रमातून जनतेला बाहेर काढले नाही, तर न्यायव्यवस्थेवरील विश्वासाला तडे जातील व देशाला ते परवडणारे नाही. हे सर्व करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची नाही, अशी भूमिका या अग्रलेखातून मांडण्यात आली आहे. 

एकूणच या अग्रलेखाचा सूर पाहता शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच दिलजमाई झाल्याचे दिसत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून ते ठसवण्याचा प्रयत्नही केला जात आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरला जाणार आहेत. भाजपचे अमित शहा आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन होणार आहे. त्यासाठी अमित शहा यांनी गुरुवारी रात्री उद्धव यांना फोन करून गांधीनगरमध्ये उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. उद्धव ठाकरे यांनीही कोणतेही आढेवेढे न घेता हे आमंत्रण स्वीकारले होते.