शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष असेल - माणिकराव ठाकरे

मुख्यमंत्रिपदी पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याखेरीज राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितले. 

Updated: Nov 22, 2019, 06:51 PM IST
शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष असेल - माणिकराव ठाकरे title=

मुंबई : मुख्यमंत्रिपदी पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याखेरीज राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितले. तर मंत्रिपदांबाबत अजून निर्णय झाला नसल्यांचही ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये या पदासाठी चुरस सुरू आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता अजून निवडलेला नाही. 

दरम्यान, शिवसेनेने आपल्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री पदासाठी आमदारांची मत जाणून घेण्यात आली. मात्र, मुख्यमंत्री ठरविण्याचा सर्वाधिकार आमदारांनी उद्धव यांना दिला आहे. ते घेतील तो अंतिम निर्णय असेल, असेही काही आमदारांनी बैठकीनंतर मीडियाशी बोलताना सांगितले. त्यामुळे महाविकासआघाडीचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

शिवसेना-भाजप युती ही मुख्यमंत्री पदावरुन तुटली. त्यानंतर राज्यात नवी राजकीय समीकरणे पाहायला मिळालीत. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशी शिवमहाआघाडी झाली. आता या शिवमहाआघाडीचे नामकरण होऊन विकासआघाडी ठेवण्यात आले आहे. आता विकासआघाडीच्या नावाखाली राज्यात सरकार स्थापन होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

दरम्यान, काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्रिपदावरून जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये या पदासाठी चुरस सुरू आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता अजून निवडलेला नाही. त्यामुळं उपमुख्यमंत्रिपदाचा काँग्रेसचा उमेदवार कोण, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधीच घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना प्रणित महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या पत्रावर काँग्रेस आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचं काम सध्या सुरू आहे.

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावं, अशी अपेक्षा जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली. तर मुस्लिमांना आरक्षण देण्याचा शब्द उद्धव ठाकरेंनी खरा करुन दाखवावा, असे समाजवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबू आझमी यांनी म्हटले आहे. तर किमान समान कार्यक्रमानुसार महाविकासआघाडीनं वाटचाल करावी, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलंय. आघाडीची मित्रपक्षांबरोबर बैठक झाली, त्यामध्ये सगळे नेते सहभागी झाले होते. 

भाजपने शिवसेनेचा विश्वासघात केला. एनडीएतून बाहेर काढले, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत केला. दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ५०-५० च्या फॉर्म्युलाबाबत खोटे विधान केले, असे उद्धव ठाकरे या बैठकीत म्हणाले. तर आमदारांनी पुढील मुख्यमंत्री कोण असावा, यावरही भाष्य केले. शिवसेना आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदासाठी आमदारांची उद्धव ठाकरेंच्या नंतर एकनाथ शिंदेंच्या नावाला पसंती देण्यात आल्याची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय हे उद्धव ठाकरेच घेतील आणि सर्व सेनेचे आमदार हे मुंबईतच राहणार असल्याची माहिती शिवसेना आमदारांनी दिली. मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीनंतर सेना आमदारांनी ही प्रतिक्रिया दिली.