'बेस्ट'च्या भाडेवाढीमुळे आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले 'सामान्य मुंबईकरांवर...'

शुक्रवारी 1 मार्चपासून बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. बेस्ट पाससाठी नवे दर लागू करण्यात आले आहेत. 

Updated: Mar 2, 2024, 03:02 PM IST
'बेस्ट'च्या भाडेवाढीमुळे आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले 'सामान्य मुंबईकरांवर...' title=

Aaditya Thackeray On Best Fare Hike : मुंबई लोकलनंतर मुंबईकरांसाठीची लाईफलाईन म्हणून बेस्ट बसला ओळखले जाते. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या दैनंदिन आणि मासिक पासच्या दरात वाढ करण्यात आली आहे. बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांनी, तर मासिक पासच्या दरात 150 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयामुळे पासधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पण या निर्णयावर शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे. 

आदित्य ठाकरे यांनी नुकतंच ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी बेस्टच्या दैनंदिन आणि मासिक पासच्या दरवाढीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "बेस्ट बसेस ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. दररोज ३५ लाखाहून जास्त मुंबईकर बेस्टने प्रवास करतात. शाळकरी मुलांपासून ते कष्टकरी मोठ्यांपर्यंत सगळेच बेस्टचा लाभ घेतात. 'वाजवी किमतीत उत्तम प्रवास' ह्यामुळेच बेस्ट मुंबईकरांची लाडकी आहे! ह्या बेस्टच्या मासिक आणि साप्ताहिक पासच्या दरात केलेली प्रचंड दरवाढ हा सामान्य मुंबईकरांवर अन्याय आहे! प्रचंड महागाईच्या काळात बेस्टचा प्रवासही ८७% ने महागणं योग्य नाही. बेस्ट प्रशासनाने पासची ही भाडेवाढ तातडीने मागे घ्यावी!", असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरेंचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. 

'बेस्ट'चा प्रवास महागला

शुक्रवारी 1 मार्चपासून बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. बेस्ट पाससाठी नवे दर लागू करण्यात आले आहेत. 1 मार्चपासून बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात 10 रुपये तर मासिक पासच्या दरात 150 रुपयांनी वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना मासिक पाससाठी 750 रुपयांऐवजी 900 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांची वाढ करण्यात आली असून आता तुम्हाला 50 रुपयांऐवजी 60 रुपये मोजावे लागणार आहेत. 

बेस्टने पासच्या दरात वाढ केल्याने मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दरम्यान बेस्टच्या तिकीट दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. फक्त दैनंदिन पास आणि मासिक पासच्या दरात वाढ झाली आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठीची सवलतही बेस्टने कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांसाठी 200 रुपयांच्या मासिक पासमध्ये अमर्याद बस फेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे.  

बेस्ट बसही मुंबईकरांची सेकंड लाईफलाईन आहे. बेस्टने दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. यामुळे पास दरवाढीचा फटका लाखो मुंबईकरांना बसला आहे. बेस्टचे उत्पन्न आणि महसूल वाढवण्यासाठी आणि प्रवाशांसाठीच्या पास पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्याची दरात बदल करण्यात आल्याचं बेस्ट प्रशासनाने सांगितलं आहे. बेस्टच्या नव्या दरांमुळे सुमारे 10 लाख पासधारकांना आर्थिक फटका बसणार आहे.