'दाऊद काय, त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीचं काही वाकडं करु शकत नाही'

'पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही'

Updated: Sep 6, 2020, 07:39 PM IST
'दाऊद काय, त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीचं काही वाकडं करु शकत नाही' title=
संग्रहित फोटो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शनिवारी धमकीचा फोन आला. त्यानंतर आता, मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मातोश्रीवर दाऊदच्या नावाने दुबईतून धमकीचा फोन आल्यानंतर, धमकी देणारा कोण होता, याचा तपास सुरक्षा यंत्रणांकडून सुरु आहे. उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर आलेल्या फोननंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी, दाऊद काय त्याच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मातोश्रीचं वाकडं करु शकणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

मातोश्री हे मराठी माणसाचं सन्मानाचं स्थान आहे. पाकिस्तानदेखील मातोश्रीचं वाकड करु शकत नाही. दाऊद हा दुसऱ्याचा आश्रय घेऊन राहतो. पोकळ धमक्यांना शिवसेना घाबरत नाही, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. 

दुबईहून 'तो' फोन येताच 'मातोश्री'ची सुरक्षा वाढवली

शिवसेनेसह काँग्रेसच्या नेत्यांनेही मातोश्रीवर आलेल्या फोननंतर मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं आहे. अशा धमक्यांना सरकार घाबरणार नसून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचं अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु, असं म्हणत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

'आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु'

केंद्रात इतकं मजबूत सरकार असताना मातोश्री उडवण्याची भाषा आहे, याची चौकशी केंद्र सरकारने करुन कारवाई केली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसंच राजकारण कोणत्या स्तराला जात आहे याचं हे लक्षण आहे, धमकी द्यायची हिंमत केली जाते, मात्र महाराष्ट्राची जनता आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत  त्यांना कोणी बोट लावू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.