अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेणार, शिवसेनेचा अमित शाहंवर पलटवार

अमित शाह यांनी खुद्द महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला आवाज दिलाय. 

Updated: Jan 6, 2019, 10:36 PM IST
अंगावर येणाऱ्याला शिंगावर घेणार, शिवसेनेचा अमित शाहंवर पलटवार title=

मुंबई : अमित शाह यांनी खुद्द महाराष्ट्रात येऊन शिवसेनेला आवाज दिलाय. बरोबर आला तर ठीक नाही तर उचलून आपटू असं थेट आव्हान अमित शाह यांनी शिवसेनेला दिलं. यावर आता शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलं आहे. अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

शिवसेनेची प्रतिक्रिया

"भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील हिंदूंच्या मनातील भावना मांडली आणि हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार असा नारा दिला. तो झोंबल्या मुळेच आणि शिवसेनेच्या आसूड ओढण्यामुळेच भाजपच्या पाया खालची जमीन सरकली आणि आता भाजप नेत्यांच्या जीभा ही सरकू लागल्या. एकंदर चांगलेच झाले, भाजपला हिंदुत्व मानणारे नको असेच दिसते आहे. ५ राज्यांच्या निकलानंतर तसेही भाजपचे अवसान गळले आहेच. भारतीय जनतेने त्याना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहेच. लोकसभेच्या महाराष्ट्रात ४० जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपने आपली इव्हीएमशी युती होणार हे जाहीर केलेच आहे. तसेही त्यांच्या अनील गोटे नावाच्या आमदाराने धुळे महानगरपालिकेत यांचे भांडे फोडलेच आहे. आता होऊंन जाऊद्या. शिवसेना तसेही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेच. येऊ दया अंगावर, होऊ दया सामना. हा महाराष्ट्र तुम्हाला आस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही", अशी अधिकृत प्रतिक्रिया शिवसेनेकडून देण्यात आली आहे.

काय म्हणाले अमित शाह?

भाजपचे अध्यक्ष अमित शाह हे सध्या लातूरमध्ये आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख भाजप पदाधिकाऱ्यांशी अमित शाह यांनी संवाद साधला. लातूर-नांदेड-हिंगोली आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५ हजार ७१३ भाजपा पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. लातूरमध्ये ही बैठक पार पडली.

या बैठकीमध्ये भाजप अध्यक्षांनी स्वबळाचे संकेत दिले आहेत. 'वन प्लस वन टू नही होता, युती होगी तो साथी को जितायेंगे नही हुई तो पटक देंगे', असं अमित शाह भाजप कार्यकर्त्यांना म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अमित शाह यांच्यासमोर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्वबळाचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ४८ पैकी ४० जागा जिंकण्यासाठी तयार राहण्याची सूचना केलीय. लातूर, नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबादमध्ये भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असं मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितलं.

...नाही तर शिवसेनेला 'पटक देंगे', अमित शाहंचे स्वबळाचे संकेत