मुंबईतील निर्भयाप्रकरणी कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल - गृहमंत्री

Mumbai Nirbhaya case : मुंबई साकीनाका येथे झालेली बलात्काराची ( Rape) घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक...

Updated: Sep 11, 2021, 10:27 AM IST
मुंबईतील निर्भयाप्रकरणी कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल - गृहमंत्री title=
संग्रहित छाया । सौजन्य : दिलीप वळसे-पोटील फेसबूक पेज

मुंबई :  Mumbai Nirbhaya case : मुंबई साकीनाका येथे झालेली बलात्काराची ( Rape) घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

धक्कादायक घटना मुंबईत

दिल्लीतील निर्भयासारखी धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. याबाबत संताप व्यक्त होत आहे. शहरातील साकीनाका भागात महिलेवर बलात्कार (Women Rape) करण्यात आला आहे. या घटनेनंतर महिलेची (Women) प्रकृती चिंताजनक झाली आहे. या घटनेप्रकरणी एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

महिलेची मृत्यूशी झुंज 

साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिशय चीड आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. महिलेवर बलात्कार करून त्या महिलेच्या गुप्तांगात लोखंडी सळी सारखी वस्तू घुसवून तिला गंभीर जखमी केले आहे. तर ती महिला आता मृत्यूशी झुंज देत आहे. सकिनाका खैरनी रोड येथील एका स्टुडिओजवळ एका टेम्पोत हा सर्व प्रकार घडला आहे. मानवतेला काळिमा फासणारा हा प्रकार घडला आहे. रात्री तीन वाजताच्या दरम्यान पोलीस कंट्रोल रुमला फोन आला. एका महिलेला कोणीतरी मारत असून ती गंभीर जखमी आहे. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या महिलेला राजावाडी रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी या महिलेची तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. तिच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान ही महिला रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेत आणि जवळील सीसीटीव्हीच्या साह्याने तपास करत एका आरोपीला अटक केली आहे. पुढील  तपास करत आहे. या प्रकरणात आणखी कोण आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.