नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार, ठाणे, दादर रेल्वे स्थानकाबाबत महत्त्वाची माहिती

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वे मार्गावरील नेहमीच गर्दीची स्थानके असणारी दादर आणि ठाणे या स्थानकांबाबत एक दिलासादायक बातमी समोर येतेय.   

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 7, 2024, 01:12 PM IST
नागरिकांचा प्रवास आरामदायी होणार, ठाणे, दादर रेल्वे स्थानकाबाबत महत्त्वाची माहिती title=
Thane and Dadar railway station development Project to be completed by May 2024

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वे मार्गावरील दादर आणि ठाणे हे दोन्ही स्थानके नेहमी गर्दीने तुंडूब भरलेली असतात. पाय ठेवायलाही जागा नसलेल्या या स्थानकातील प्लॅटफॉर्मवर प्रवाशी नेहमीच दाटीवाटीने उभे असतात. त्यामुळं रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं प्रवाशांना थोडा मोकळा श्वास घेता येणार आहे. 

रेल्वेने दादरचे प्लॅटफॉर्म क्रमांक 10-11 आणि ठाण्यातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5-6 चे रुंदीकरण करण्यात येत आहे. कारण गर्दीच्या वेळी या प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना उभं राहण्यास खूप त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणारे प्रवासीदेखील याच प्लॅटफॉर्मवर उभे असतात. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मे 2024पर्यंत या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

दादर स्थानकासाठी काय आहे प्लान

दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 10-11वर लोकल, मेल- एक्स्प्रेस या दोन्ही प्रकारच्या ट्रेन धावतात. त्यामुळं या प्लॅटफॉर्मवर सामानासह प्रवासी लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहत उभे असतात. तसंच, लोकल प्रवाशीही तिथेच लोकलची वाट पाहत उभे असतात. प्लॅटफॉर्मची रुंदी कमी असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 11 आणि 12 प्लॅटफॉर्मच्या मध्ये एकच प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे 11 वर ट्रेन आल्यास प्रवासी दोन्ही प्लॅटफॉर्मवर उतरु शकतात. त्यासाठीच प्लॅटफॉर्म क्रमांक 12च्या येथून ग्रिल हटवून त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे.

ठाणे स्थानकातही रुंदीकरणाचे काम सुरू

ठाणे स्थानकातही दादरप्रमाणेच काम हाती घेण्यात आले आहेत. ज्या प्लॅटफॉर्मवर मेल-एक्सप्रेस आणि लोकल ट्रेनचे प्रवासी उभे राहतात त्या 5-6 या फलाटाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. सध्या या प्लॅटफॉर्मची रुंदी 8 मीटर असून आणखी 3 मीटर रुंदीकरण करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेला तेथील रूळदेखील हटवावे लागणार आहेत आणि दोन रूळांदरम्यान असलेले गार्डनदेखील हटवण्यात येणार आहे. गार्डन हटवल्यानंतर रुळांचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागण्याची गरज पडणार आहे. यामुळं काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मात्र 11 मीटर  रुंद प्लॅटफॉर्म झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

मध्य रेल्वेवर महाब्लॉगची तयारी

मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनन्स (LTT) स्थानकात या महिन्यात महाब्लॉक घेण्याच्या तयारीत आहे. LTTवर प्लॅटफॉर्मची संख्या 5 वरुन सात करण्यात आली आहे. या नव्या दोन प्लॅटफॉर्मच्या कट अँड कनेक्शनसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या दरम्यान लोकल ट्रेनच्या फेऱ्यांवर होणारा परिणाम कमी असेल मात्र लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर त्याचा परिणाम होणार आहे.