वाहन उद्योगावर मंदीचं भलंमोठं संकट

एप्रिल ते जून या तिमाहीत वाहन उत्पादनात तब्बल अकरा टक्क्यांची कपात

Updated: Aug 19, 2019, 06:11 PM IST
वाहन उद्योगावर मंदीचं भलंमोठं संकट title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : सध्या वाहन उद्योगावर मंदीचं भलंमोठं संकट घोंगावतं आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत वाहन उत्पादनात तब्बल अकरा टक्क्यांची कपात झाली आहे. या क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांची रोजीरोटी त्यामुळं संकटात आली आहे. 

देशातला वाहन उद्योग सध्या अडचणीत सापडलाय. जीएसटीचे चढे दर, वाढता उत्पादन खर्च, लिक्विडीटीचा अभाव आणि वाहनांची घटलेली मागणी ही यामागची काही प्रमुख कारणं आहेत. या उद्योगातील अनेकांनी नोकऱ्या गमावल्यात. वाहनांच्या सुट्ट्या भागांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना या मंदीची सर्वाधिक झळ बसली आहे.

देशात वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या सुमारे पन्नास हजार कंपन्या आहेत. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या पाच कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत. देशाच्या जीडीपीत या क्षेत्राचा हिस्सा २.३० टक्के आहे. गेल्या दिवाळीनंतर वाहन क्षेत्रातल्या मंदीचा प्रभाव जाणवायला सुरुवात झाल्याचं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगत आहेत.

केंद्र सरकारनं इलेक्ट्रीकल वाहनांना प्रोत्साहन देण्याचं धोरण या मंदीला कारणीभूत असल्याची देखील चर्चा आहे. मात्र त्यामुळं या क्षेत्रातील लाखो लोकं बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. सरकारनं या मंदीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे.