आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड होणार नाही

मेट्रोची कारशेड आता आरेमध्ये होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Updated: Sep 2, 2020, 10:17 PM IST
आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड होणार नाही title=

कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मेट्रोची कारशेड आता आरे कॉलनीमध्ये होणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीआधी आरेमध्ये उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या कारशेडवरुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं. 

शिवसेनेने आरे कॉलनीतल्या मेट्रोच्या कारशेडला विरोध केला होता. तसंच सत्तेत आल्यानंतर आरे कॉलनीतील मेट्रोची कारशेड रद्द करु, असं आश्वासन शिवसेनेने दिलं होतं. यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आरेमधल्या कारशेडच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर आता मेट्रोची कारशेड आरे कॉलनीत होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचं संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. महानगराच्या मध्यभागी अशा रितीने विस्तीर्ण जंगल फुलवण्याचं संपूर्ण जगातील हे पहिलंच उदाहरण ठरणार असल्यांही मुख्यमंत्री म्हणाले.