Mumbai : बांधकाम सुरु असतानाच भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली अडकल्याने दोघांचा मृत्यू

Bhandup : भांडुप पश्चिम येथील खिंडीपाडा परिसरात झालेल्या या अपघातात दोघांना जीव गमवावा लागला आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यानंतर परिसरात खळबळ उडाली

Updated: Feb 12, 2023, 05:48 PM IST
Mumbai : बांधकाम सुरु असतानाच भीषण अपघात; ढिगाऱ्याखाली अडकल्याने दोघांचा मृत्यू title=

Mumbai News : रविवारी सकाळी झालेल्या एका अपघातात दोघांना जीव गमवावा लागण्याची घटना भांडुपमध्ये (Bhandup West) घडलीय. भांडुप पश्चिम येथील खिंडीपाडा परिसरात दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक एका घराचा स्लॅब कोसळला. या घटनेत ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. स्लॅब कोसळून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) या घटनेला दुजोरा दिला असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. 

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सकाळी 9.30 च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत ढिगाऱ्याखाली दबून दोघांचा मृत्यू झाला. राजकुमार धोत्रे (19 ) आणि रामानंद यादव (18) अशी मृतांची नावे आहेत.  ग्राउंड प्लस एक मजली घरासाठी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामात स्लॅबचा काही भाग पडल्याने दोघेही ढिगाऱ्याखाली दबले गेले. अपघातानंतर अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत दोघांना ढिगाऱ्याकाढून बाहेर काढले आणि जवळच्या एमटी अग्रवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

काम सुरु असताना अचानक स्लॅब कोसळ्यानंतर दोन्ही तरुण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यानंतर बचावकार्यासाठी मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर दोन्ही लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोघांनाही मुलुंड पश्चिमेकडील एमटी अग्रवाल महापालिका रुग्णालयामध्ये नेण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच  डॉक्टरांनी दोन्ही तरुणांना मृत घोषित केले होते. 

दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. महापालिका आणि पोलिसांनी घराच्या दुरुस्तीच्या कामासाठी परवानगी घेण्यात आली होती की नाही याचा तपास करण्यास सुरुवात केला आहे. तसेच बांधकाम करताना आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली गेली होती का याचीही पाहणी केली जात आहे. दुसरीकडे चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.