भूमिका घ्यायची तेव्हा नक्की घेणार, उद्धव ठाकरेंचा आणखी एक इशारा

सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे असून जेव्हा भूमिका घ्यायची तेव्हा भूमिका नक्की घेणार, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. 

Updated: Jan 27, 2018, 03:23 PM IST
भूमिका घ्यायची तेव्हा नक्की घेणार, उद्धव ठाकरेंचा आणखी एक इशारा title=

मुंबई : सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे असून जेव्हा भूमिका घ्यायची तेव्हा भूमिका नक्की घेणार, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलीय. 

परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना आणि मुंबई वृत्तपत्र संघटना यांचं एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे उपस्थित होते. 

महापालिका आमच्या ताब्यात आहे. सरकारमध्ये आम्ही अर्धे-मुर्धे आहोत... आता म्हणाल नाराज आहात तर सत्तेतून बाहेर का नाही पडत? मी भूमिका घेत असतो. पण माझाही काही विचार आहे. ज्यावेळी भूमिका घ्यायची त्यावेळी ती घेणार... माझ्या स्वार्थासाठी नाही तर मराठी आणि हिंदूंसाठी घेणार, असं म्हणत पुन्हा एकदा भाजप सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिलाय.

गेल्या वर्षभरात शिवसेनेनं सरकार नोटीस पिरियडवर आहे, सरकारला हा आमचा अल्टीमेटम आहे, निर्णय घेण्याची वेळ जवळ आलीय असे अनेकदा धमकीवजा इशारे दिले आहेत... आज त्याचाच एक पुढचा भाग उद्धव ठाकरेंच्या तोंडून बाहेर आला. 

वेळ आल्यावर मराठी आणि हिंदूंसाठी ठाम भूमिका घेऊ, असं आश्वासन उद्धव यांनी दिलंय. तसंच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अपेक्षांना तडा जाऊ देणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.