VIRAL व्हिडिओ : फसू नका, हे 'बीपीसीएल' स्फोटातील दृश्यं नाहीत

व्हॉटसअप आणि फेसबूकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय

Updated: Aug 8, 2018, 06:24 PM IST

मुंबई : चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाच्या आवाजाने संपूर्ण माहुलगाव हादरलं आहे. या स्फोटात ४३ जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडिओ, बीपीसीएल स्फोटाचा आहे, असं सांगून व्हॉटसअप आणि फेसबूकच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. पण, मुंबईकरांनो फसू नका... 

हा मुंबईचा व्हिडिओ नाही... 

कारण व्हायरल होणारा हा व्हिडिओ मेक्सिको येथील गॅस स्फोटाचा व्हिडिओ आहे. २०१२ साली मेक्सिकोमध्ये झालेल्या या स्फोटात ३२ जण जखमी झाले होते. स्फोटाचा हा व्हिडिओ अंगावर काटा उभा करतो. प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांना स्फोटाच्यावेळी आपला जीव वाचवता आला नाही. तर काहींनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीच्या लोळात ते सापडले. आणखी काही कामगार आतमध्ये अडकल्याची माहिती आहे. 

भूकंप झाल्यासारखे धक्के जाणवल्याने बाजूच्याच माहुलगाव, गव्हाणपाडा आणि विष्णूनगर झोपडपट्टीतील लोक घाबरून घराबाहेर पडले. त्यानंतर लगेच धूर आणि आगीचे प्रचंड लोळ उठल्याने लोक आणखीनच हादरले. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ झाला. या स्फोटाचे आवाज येताच भारत पेट्रोलिएमच्या अग्निशमन दलाने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केलेत. शिवाय कंपनीतील कामगारांनाही बाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या कंपनीत सुमारे ७०० हून अधिक कामगार काम करत असून त्यापैकी आतापर्यंत अनेक कामगार अडकलेत. त्यांना कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, ४३ कामगार जखमी झालेत. तर २१ कामगारांवर उपचार करण्यात आले आहेत.