बाळासाहेबांनी काढलेला शिवसेनेचा 'तो' ऐतिहासिक 'वाघ' आहे तरी कुठे?

 कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला... शिवसेनेच्या प्रत्येक सभेत गरजणारी ही गगनभेदी ललकारी..

Updated: May 13, 2022, 08:46 PM IST
बाळासाहेबांनी काढलेला शिवसेनेचा 'तो' ऐतिहासिक 'वाघ' आहे तरी कुठे? title=

मुंबई : कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला... शिवसेनेच्या प्रत्येक सभेत गरजणारी ही गगनभेदी ललकारी.. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं सभेत आगमन झालं की हमखास ही ललकारी व्हायचीय... आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेतही आता ललकारी गरजतात पण त्या शिवसैनिकांच्या अंगावर बरसत नाहीत.

एके काळी शिवसेनेचं 'जात, धर्म आणि गोत्र आमचा शिवसेना हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेला मानणाऱ्या अनेकांनी मोबाईल रिंगटोनला हे गाणं ठेवलं होतं आणि वॉलपेपरला होता शिवसेनेचा वाघ.

बाळासाहेबांच्या कट्टर शिवसैनिकांचं आणि शिवसेनेच्या वाघाचं नातं हे फार जुनं आहे. काळ पुढे सरकत राहिला. सत्तेचा रिमोट माझ्या हातात असेल असं सांगणाऱ्या बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविली. ते जिंकले. पण... आपल्या नातवाचा उत्कर्ष पहायला बाळासाहेब नव्हते.

बाळासाहेब ठाकरे अनंतात विलीन झाले आणि शिवसेनेचा ताबा उद्धव ठाकरे यांच्याकडे आला. महाविकास आघाडी सरकार स्थापन करून उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक सभेत भव्य दिव्य व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे यांची छबी झळकू लागली.

अन्य राजकिय पक्षांप्रमाणे शिवसेनाही हाय-टेक आणि सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. पण, मराठी माणसांमध्ये शिवसेनेची ओळख रुजवणारा सेनेचा ‘वाघ’ जाहीर सभांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसणं जवळपास बंदच झालं आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे संपादित ‘Bal Keshav Thackeray: A Photobiography’ पुस्तकात बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेलं शिवसेनेचं बोधचिन्ह आहे. महाराष्ट्राच्या नकाशाच्या आऊटलाईनमध्ये अगदी मधोमध डरकाळी फोडणारा वाघ आहे, बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे. एका कोपऱ्यात ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या ओळी लिहिल्या आहेत आणि खाली मोठ्या अक्षरात शिव सेना हे शब्द आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः ही ‘व्याघ्रमुद्रा’ चित्रित केली होती. शिवसेनेचा हा ‘लोगो’ बनलेला वाघ सेनेच्या शाखा, नाकानाक्यावरील फळ्यांवर, फ्लेक्स, बॅनर आणि बाळासाहेबांच्या जाहीर सभांमध्ये झळकू लागला. 

शिवसेनेच्या आक्रमकतेचं, कुणालाही भिडण्याच्या हिंमतीचं प्रतीक म्हणजेच हा 'वाघ'. पण, हाच वाघ आता शिवसेनेच्या जाहीर सभांमधून गायब होऊ लागला. परंतु, शिवसैनिकांच्या मेळाव्यात बाळासाहेबांना चांदीचं सिंहासन भेट देण्यात आलं त्यावर हा वाघ चितारला होता.

आदित्य ठाकरे यांची २०१० च्या दसरा मेळाव्यात राजकारणात एंट्री झाली. तेव्हा व्यासपीठावर मध्यभागी हा वाघ दिमाखात झळकत होता. तर, २०१२ च्या मेळाव्यातही फ्लेक्सवर वाघाचा लोगो होता. मात्र, या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरे प्रत्यक्षात उपस्थित नव्हते. 

२०१३ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. त्या नंतरच्या पहिल्या मेळाव्यात स्टेजमागे फक्त बाळासाहेब ठाकरे यांचाच फोटो होता. २०१४ मध्ये वाघाचा लोगो पोडियमवर होता. परंतु, २०१५ च्या दसऱ्या मेळाव्यात वाघाचे दर्शन झाले नाही. कोरोनामुळं २०२० मध्ये बंदिस्त सभागृहात झालेल्या मेळाव्यातही हा वाघ दिसला नाही. २०२० आणि २०२१ च्या दसरा मेळाव्यातही बॅकग्राऊंडला बाळासाहेब होते. 

२०१४ च्या निवडणुकीआधी शिवसेनेने अधिकृत फेसबुक पेजचा प्रोफाइल फोटो म्हणून हा वाघ ठेवला होता. पण, ऑगस्ट २०१४ नंतर सेनेनं धनुष्यबाणाची निशाणी प्रोफाइल फोटो म्हणून वापरली. शिवसेनेच्या अधिकृत सोशल माध्यमावर किंवा जाहीर सभांमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी असलेल्या वाघाला पुन्हा एकदा स्थान मिळणार की नाही याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

पण, एक मात्र नक्की की जरी हा वाघ बॅनर, फ्लॅक्स, सोशल माध्यमावरून गायब झाला असला तरी ती महाराष्ट्रातील लाखो शिवसैनिकांच्या मनामनात कायम ठसला आहे.