जयकुमार रावल धडधडीतपणे खोटं बोलले... पुरावा 'झी २४ तास'च्या हाती

'तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत आपण कधीच संचालक नव्हतो असा ठोस दावा राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केलाय. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरवणारी कागदपत्रे 'झी २४ तास'च्या हाती लागलीत.

Updated: Feb 8, 2018, 08:15 PM IST
जयकुमार रावल धडधडीतपणे खोटं बोलले... पुरावा 'झी २४ तास'च्या हाती title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : 'तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत आपण कधीच संचालक नव्हतो असा ठोस दावा राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केलाय. मात्र, त्यांचा हा दावा फोल ठरवणारी कागदपत्रे 'झी २४ तास'च्या हाती लागलीत.

काय आहे प्रकरण?

रावल यांनी 'तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनी'च्या माध्यमातून एमटीडीसीचे रिसॉर्ट बेकायदेशीर बळकावले असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांनी केला होता. त्यानंतर रावल यांनी हा खुलासा केला होता.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हिल रिसॉर्ट बेकायदेशीररित्या बळकावणे आणि पर्यटन विभागाचे ४१ लाखांचे भाडेही थकल्याप्रकरणी विरोधकांचे आरोप फेटाळताना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी हा दावा केला होता. तोरणमाळ हिल रिसॉर्ट कंपनीशी आपला किंवा आपल्या कुटुंबाचा कुठलाही संबंध नसल्याचा दावा ते करतायत. मात्र, रावल यांचा हा दावा खोटा आहे हे दर्शवणारी कागदपत्रं 'झी मीडिया'च्या हाती लागलीत.

'झी २४ तास'कडे कागदपत्रं

त्यातील पहिली कागदपत्रे आहेत ती मंत्रालयात पार पडलेल्या एका बैठकीची. रावल मंत्री होण्यापूर्वी २१ मे २०१५ रोजी पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे तोरणमाळ हिल रिसॉर्टबाबत एक बैठक पार पडली होती. या बैठकीला आमदार जयकुमार रावल स्वतः हजर होते. या बैठकीचे इतिवृत्त म्हणजेच बैठकीचे मिनिटस् झी मीडियाच्या हाती लागलेत. 

तोरणमाळ हिल रिसॉर्टचे जयकुमार रावल असा स्पष्ट उल्लेख या इतिवृत्तात आहे. म्हणजे या कंपनीशी रावल यांचा संबंध असल्याचे यावरून स्पष्ट होते. 

तसंच या कंपनीने धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे ४ एकर जमीन खरेदी केल्याचा उल्लेखही या कागदपत्रांत आहे. या जमिनीचा सातबारा 'झी मीडिया'कडे उपलब्ध आहे. 

जयकुमार रावल मंत्री झाल्यानंतर त्यांनी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र तोपर्यंत ते या कंपनीचे संचालक होते हे उघड आहे. विरोधकांनी यासंदर्भात आरोप केल्यानंतर रावल यांनी आपला या कंपनीशी काहीही संबंध नसल्याचा खोटा दावा का केला हा प्रश्न आता उपस्थित होतो आणि त्यामुळे त्यांच्याभोवतीचे संशयाचे धुके अधिक गडद होते.