'झी २४ तास' स्टिंग ऑपरेशन : आरटीओ अधिकारी - दलालांचा भांडाफोड

मुंबईतल्या ताडदेव आरटीओमधले अधिकारी आणि दलाल यांच्या संगनमतानं कसा भ्रष्टाचार सुरूय, याची पोलखोल 'झी २४ तास'नं केलीय. दलालांना हाताशी धरून आरटीओ अधिकारीच कसे मालामाल होतायत, हे यातून स्पष्ट झालंय.  

Updated: Jul 18, 2017, 09:03 AM IST
'झी २४ तास' स्टिंग ऑपरेशन : आरटीओ अधिकारी - दलालांचा भांडाफोड  title=

देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या ताडदेव आरटीओमधले अधिकारी आणि दलाल यांच्या संगनमतानं कसा भ्रष्टाचार सुरूय, याची पोलखोल 'झी २४ तास'नं केलीय. दलालांना हाताशी धरून आरटीओ अधिकारीच कसे मालामाल होतायत, हे यातून स्पष्ट झालंय.  

"साहेबांचं काय ते आम्ही बघून घेणार..." 

"त्यांचा काय हिशोब आहे ते घेणारच. साहेब एकटा घेत नाही. त्यांचा ग्रुप आहे. फक्त इथेच नाही तर पुढे पर्यंत पैसे जातात"

"मंत्री सगळे खातात... चोर आहेत...सगळे खातात..."

"एजंट फक्त मार्गदर्शनाचे पैसे घेतो. 300-400 बाकीचे अधिकारीच घेतात"

"इतनी मेहनत करके हमको 400-500 ही मिलते है... बाकी अंदर देना पडता है..."

परिवहनमंत्री रावतेजी, हे पाहताय ना...?

मुंबईतल्या ताडदेव आरटीओमध्ये दिवसाढवळ्या कसा भ्रष्ट कारभार सुरूय, त्याचंच हे स्टिंग ऑपरेशन... दलाल पैसे खातात, पण आरटीओ अधिकारी प्रामाणिकपणं काम करतायत, असं सर्टिफिकेट परिवहनमंत्री दिवाकर रावते अलिकडेच दिलं होतं. पण, मंत्रीमहोदय, तुमच्या खात्यात काय चाललंय, हे उघड करण्यासाठी हे स्टिंग ऑपरेशन पुरेसं आहे. 

वाहन चालकाचा परवाना काढणं, परवान्याचं नुतनीकरण करणं, गाडी पासिंग करणं अशा एक ना अनेक कामांसाठी आरटीओच्या खेपा घालाव्या लागतात. पण दलालाला गाठलं की, हीच कामं अगदी चुटकीसरशी होतात. त्यासाठी दलालांच्या हातावर आणि सरकारी कागदावर थोडं वजन ठेवलं की झालंच समजा तुमचं काम... त्याचीच झलक या स्टिंग ऑपरेशनमध्ये पाहायला मिळाली.

आरटीओ दलालमुक्त करण्याच्या घोषणा झाल्या... पण दलालांच्या साखळीशिवाय आरटीओतलं पानही हलत नाही, हे या स्टिंग ऑपरेशननं पुन्हा एकदा उघड केलंय. या दलालांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे, हे वेगळं सांगायची गरजच नाही. यात आमच्या अधिकाऱ्यांना फक्त 500 रूपये मिळतात, असं सांगून रावतेजी या भ्रष्टाचारावर पांघरूण घालू नका... 'न खाता हूँ और ना खाने देता हूँ' असं सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशात आरटीओ अधिकाऱ्यांनी अशी 500 रुपयांची दूधमलई खाणं योग्य आहे का? रावतेजी, आता तुम्हीच काय ते उत्तर द्या...