भाजपाचा राष्ट्रवादीला ‘दे धक्का’

Updated: Jun 20, 2012, 08:04 AM IST
झी २४ तास वेब टीम, पुणे

पुणे खडकवासला पोटनिवडणुकीत भाजपाचे भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादीच्या हर्षदा वांजळे यांचा ३८२५ मतांनी पराभव केला. हा भाजपाचा ‘दे धक्का’ राष्ट्रवादीला पर्यायाने उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांना ‘शॉक ‘ देणारा ठरला आहे.

... मतमोजणीत खरी रंगत आली ती नवव्या फेरीनंतर कारण तोपर्यंत राष्ट्रवादीच्या हर्षदा वांजळे तीन-साडेतीन हजार मतांनी आघाडीवर होत्या. शहरी भागाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर भीमराव तापकीर यांनी २ हजार मतांची आघाडी घेतली. त्यानंतर भीमराव तापकीरांची आघाडी वाढतच गेली. नवव्या फेरीनंतर भाजपच्या भीमराव तापकीरांनी सुरूवातीला साडेसहाशे मतांची आघाडी घेतली.

पंचवीसाव्या फेरीला भीमराव तापकीर यांची आघाडी कमी झाल्याचं चित्र दिसत होतं. मात्र मतमोजणीच्या पंचवीस फेऱ्या पूर्ण झाल्या. शेवटच्या तीन फेऱ्या शिल्लक राहिल्याने तापकीर यांचा विजय निश्चित झाल्याचं दिसत होतं. मतमोजणीत भाजपा-राष्ट्रवादीच्या चढाओढीत शेवटच्या फेरीत भीमराव तापकीर यांनी ३८२५ मतांनी बाजी मारली आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या बालेकिल्ला खिंडार पाडले.

दरम्यान, मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांना तिकीट देऊन खडकवासलाची जागा जिंकण्याचा अजित पवारांचा प्रयत्न साफ फसलायं. अजित पवार खडकवासला पोटनिवडणुकीवर बारीक लक्ष ठेऊन होते. मात्र, विरोधकांनी राष्ट्रवादीचे पानीपत केलं. या निवडणुकीत सरकारविरोधातील असंतोष दिसून आला. तर या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे.