'स्वप्नांच्या पलिकडले'मध्ये नवा ट्विस्ट

'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेत सध्या थरार नाट्य रसिकांना पाहायला मिळतंय. त्यातच आता वैदहीचे दागिने आणि पैसे चोरीला जातात. वैदहीला या चोरीचा सुगावा लागतो. हे दागिने अन्विताने चोरले असल्याचं तिला कळतं.

Updated: Nov 14, 2011, 01:45 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेत सध्या थरार नाट्य रसिकांना पाहायला मिळतंय. त्यातच आता वैदहीचे दागिने आणि पैसे चोरीला जातात. वैदहीला या चोरीचा सुगावा लागतो. हे दागिने अन्विताने चोरले असल्याचं तिला कळतं. मात्र इथे अन्विता वैदहीवरच चोरीचा आरोप करते. त्यामुळे सत्य सगळ्यांसमोर उघड कऱण्यासाठी वैदही अन्विताला तिची पर्स दाखवायला सांगते, आणि अशाप्रकारे अन्विताचं पितळ उघड होतं.

 

इतक्यात अन्विताला कोणाचा तरी फोन येतो. या फोनवरून अन्विताने ही चोरी कशासाठी केली हे ही सगळ्यांच्या लक्षात येतं. गुन्ह्याची शिक्षा म्हणून आजी अन्विताला घराबाहेर जायला सांगते. अन्विता सगळ्यांची माफी मागते मात्र तिचं कोणीच ऐकत नाही. मयुरेशदेखील मुलीला घरात ठेवून अन्विताला एकटीला घराबाहेर जाण्यास सांगतो.

 

हा सगळा मेलोड्रामा सुरू असतानाच अन्विताच्या मुलीची म्हणजेच शालिनीची तब्येत अचानक बिघडते आणि याच संधीचा फायदा अन्विता घेते. अन्विता घराबाहेर जाण्याचा निर्णय घेते. यावर सगळे तिला अडवतात अपवाद फक्त आजीचा. मात्र अखेर शालिनीच्या तब्येतीचा विचार करता आजी अन्विताला थांबवते. मात्र यानंतर आजी जो निर्णय देते तो ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. आजी या घराचे दोन भाग करते.

आजीने तर या घराचे दोन भाग केल्याचा परिणाम आता या घरातील नातेसंबंधावर काय होणार आणि खरंच यातून अन्विताला धडा मिळणार का? हे लवकरच कळेल.