135 व्या जगन्नाथ यात्रेला सुरूवात

Last Updated: Thursday, June 21, 2012 - 13:05

www.24taas.com, अहमदाबाद 

 

अहमदाबादच्या जमालपूरमध्ये आजपासून 135 व्या जगन्नाथ यात्रेला प्रारंभ झालाय. इथल्या 400 वर्ष जुन्या जगन्नाथ मंदीरात आज सकाळीच जगन्नाथ रथयात्रा कडक सुरक्षेखाली सुरू झालीय.

 

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना परंपरागत पहिल्या पुजेचा मान मिळाला. या पुजेला ‘पहिंद विधी’ असं म्हटलं जातं. या विधीसाठी रस्त्यांची प्रतिकात्मक साफसफाई केली जाते. यानंतर जगन्नाथ, बलदेव, आणि त्यांची बहिण देवी सुभद्रा यांच्या वार्षिक रथयात्रेला प्रारंभ झाला. गेल्या कित्येक दशकांच्या परंपरेनुसार मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगन्नाथ रथ मंदिर परिसरापासून ओढत बाहेर आणला. शांती, एकात्मता आणि सद्भावनेच्या संगतीनं गुजरात विकास करतोय, जगन्नाथाच्या आशिर्वादानं त्याची आणखी भरभराट होवो तसंच यावर्षी चांगला पाऊस पडावा, अशी प्रार्थना मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. पुरीच्या यात्रेनंतर देश आणि जगातलं आकर्षण म्हणून अहमदाबादची ही जगन्नाथ रथयात्रा ओळखली जाते. हजारो संत केवळ या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी गुजरातमध्ये येतात.

 

ही रथयात्रा अहमादमधील सुमारे 14 किलोमीटरचा प्रवास करेल. कालूपूर, प्रेम दरवाजा, दिल्ली चकाला, दरियापूर आणि शाहपूरवरून या रथयात्रा प्रवास करणार आहे. यासाठी मोठी सुरक्षाव्यवस्था इथं तैनात करण्यात आलीय. जवळजवळ 20 हजार पोलीसांचा या सुरक्षाव्यवस्थेत सहभाग आहे. या यात्रेसाठी पहिल्यांदाच पोलीस जीपीएस आणि छुप्या कॅमेऱ्यांचा वापर करताना दिसत आहेत.

 

.

First Published: Thursday, June 21, 2012 - 13:05
comments powered by Disqus