रस्त्याच्या वादांचा फटका कोल्हापूरकरांना

कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा वाद अजूनही सुरुच आहे. टोलविरोधी कृती समितीनं रस्त्यांच्या दर्जावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानं रस्ते विकास महामंडळाला काम बंद करण्याचे आदेश आयआरबी कंपनीला देण्यात आले आहेत.

Updated: Mar 9, 2012, 08:53 AM IST

दीपक शिंदे, www.24taas.com, कोल्हापूर

 

कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा वाद अजूनही सुरुच आहे. टोलविरोधी कृती समितीनं रस्त्यांच्या दर्जावरुन आक्रमक भूमिका घेतल्यानं रस्ते विकास महामंडळाला काम बंद करण्याचे आदेश आयआरबी कंपनीला देण्यात आले आहेत. परंतु शहरातल्या अर्धवट कामांचा फटका कोल्हापुरकरांना बसत आहे.

 

कोल्हापुरातील रस्ते आणि वाद हे जणू समीकरणच बनून गेलं आहे. आयआरबी कंपनीला काम बंद ठेवण्याचं आदेश देण्यात आल्यानं शहरातल्या अर्धवट रस्ते कामांचा फटका नागरिकांना बसतोय. रस्त्यांचा दर्जा योग्य नसल्याचा आरोप करत टोलविरोधी कृती समितीनं रस्ते कामातल्या त्रुटींची यादीच आयुक्तांना दिली. याबाबत चौकशी करुन उत्तर देण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित यंत्रणेला दिले होते. मात्र त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळाले नसल्यानं कृती समितीनं आक्रमक होत रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात आंदोलन केलं होतं. त्यामुळं रस्ते विकास महामंडळाला कारवाई करणं भाग पडलं आणि संबंधित विभाग उत्तर देत नाही. तोपर्यंत काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले.

 

परंतु या काम बंदचा फटका नागरिकांना बसू लागलाय. काम सुरु असो वा बंद, कोल्हापूरकर आता या रस्त्यांच्या कामांना वैतागले आहेत. काम पूर्ण झाले तर टोल आणि अपूर्ण राहिले तर गैरसोय अशा परिस्थितीत कोल्हापूरकरांची कोंडी झाली आहे.