राष्ट्रवादीच्या गटनेत्यावर भरदिवसा गोळीबार

अकोल्याच्या गजबजलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकात अजय रामटेके या महापालिकेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आलाय. दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात इसमांनी रामटेके यांच्यावर गोळीबार केला.

Updated: May 28, 2012, 07:05 PM IST

 www.24taas.com, अकोला

 

अकोल्याच्या गजबजलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय चौकात अजय रामटेके या महापालिकेतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यावर भरदिवसा गोळीबार करण्यात आलाय. दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञात इसमांनी रामटेके यांच्यावर गोळीबार केला.

 

खाजगी कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या रामटेके यांच्यावर दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून तीन गोळ्या झाडल्या आहेत. त्यातील दोन गोळ्या रामटेके यांना लागल्या. एक गोळी त्यांच्या डोक्यात घुसली तर दुसरी गोळी त्यांच्या पायाला लागली आहे. अजय रामटेके हे नुकत्याच झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ (ब) मधून राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झालेयेत. ते सध्या अकोला महापालिकेत राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. गंभीर जखमी असलेल्या रामटेके यांना अकोल्याच्या 'आयकॉन' या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. या घटनेत रामटेके गंभीर जखमी झाले असून सध्या तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

दरम्यान, रामटेके यांच्यावर हल्ला झालेले ठिकाण अगदी अकोल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नितीन पवार यांच्या शासकीय निवास्थानासमोर समोर आहे. तर घटनास्थळाच्या समोरच जिल्हाधिकारी कार्यालय आणि बाजुला जिल्हा परिषद ही गजबजलेली ठिकाणे आहेत. घटनेनंतर तिन्ही अज्ञात इसम फरार झाले आहेत. हा हल्ला वादातून झाला की राजकीय वैमनस्यातून याबाबत पोलीसांचा अधिक तपास सुरू आहे.