वणवा पेट घेत आहे.....

मुंबईत अण्णांचं आंदोलन सुरु असताना राज्यभरात लोकपालसाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. अण्णांचं गावं राळेगणसिद्धीसह पुणे, नाशिक, नागपूर आणि नांदेडमध्ये लोकपालसाठी आंदोलन करण्यात आलं.

Updated: Dec 27, 2011, 10:37 PM IST

झी २४ तास वेब टीम

 

मुंबईत अण्णांचं आंदोलन सुरु असताना राज्यभरात लोकपालसाठी नागरिकांनी आंदोलन सुरु केलं आहे. अण्णांचं गावं राळेगणसिद्धीसह पुणे, नाशिक, नागपूर आणि नांदेडमध्ये लोकपालसाठी आंदोलन करण्यात आलं. राळेगणसिद्धीतल्या गावकऱ्यांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रभातफेरी काढली. तसंच ग्रामस्थांनी य़ादवबाबा मंदिरात उपोषणाला सुरुवात केली आहे. पुणेकरांनी डेक्कन जवळील नदीपात्रात धरणे आंदोलन करण्यात आलं.

 

वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटनांचे कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. बालगंधर्व चौकात आंदोलनाला परवानगी नाकारल्यानं अण्णा समर्थकांनी नदीपात्रात आंदोलन सुरु केलं आहे. अण्णा जोपर्यंत आंदोलन करतील तोपर्यंत पुणे शहरात आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार पुणेकरांनी केला आहे. नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अण्णा समर्थकांनी आंदोलन सुरु केलं आहे.

 

आंदोलनस्थळी लोकपालसाठी सह्यांची मोहीम सुद्धा हाती घेण्यात आली. ३०तारखेला खासदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. नागपुरकरांनी आरबीआय चौकात आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी भजन करुन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नांदेडकरांनी शहरातल्या वेगवेगळ्या भागातून रॅली काढून अण्णांना पाठिंबा दिला. तर काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.