एव्हरेस्टवरही इंटरनेटची चढाई

नेपाळच्या हिमालय पर्वतराजीत जगातला सर्वाधिक उंचीवरचा वेबकॅम बसवण्यात आला आहे. हवामान बदलांचा एव्हरेस्टवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना या वेबकॅममुळे थेट प्रतिमा उपलब्ध होतात. एव्हरेस्टसमोर असलेल्या काला पथ्थर या छोट्या डोंगरावर हा सौर उर्जेवर चालणारा वेबकॅम बसवण्यात आला आहे.

Updated: Jan 10, 2012, 06:21 PM IST

www.24taas.com, काठमांडू

 

नेपाळच्या हिमालय पर्वतराजीत जगातला सर्वाधिक उंचीवरचा वेबकॅम बसवण्यात आला आहे. हवामान बदलांचा एव्हरेस्टवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना या वेबकॅममुळे थेट प्रतिमा उपलब्ध होतात.

 

 

एव्हरेस्टसमोर असलेल्या काला पथ्थर या छोट्या डोंगरावर हासौर उर्जेवर चालणारा वेबकॅम बसवण्यात आला आहे. हा वेबकॅम उणे ३० डिग्री सेलसियस तापमानातही कार्यरत राहतो. जर्मन फर्म मोबोटिक्सने हा वेबकॅम विकसीत केला आहे.

 

अर्जेंटिनाच्या माऊंट अकोनकागुआच्या बेसकॅम्पवर ४३८९ मीटर उंचीवर वेबकॅम बसवण्यात आला त्यापेक्षा एक किलोमीटर अधिक उंचीवर एव्हरेस्ट निरीक्षणासाठी वेबकॅम बसवण्यात आला आहे. आम्ही अचूकतेसाठी काही महिने या यंत्रणेची चाचणी आणि तपासणी करण्यासाठी घालवले, असं वेबकॅम बसवणाऱ्या संशोधन चमुतील एकाने सांगितलं. हा वेबकॅम नेपाळ वेळेनुसार सकाळी ६ ते सांयकाळी ६ या वेळात काम करतो. एव्हरेस्टच्या अचूक प्रतिमा त्याद्वारे शास्त्रज्ञांना प्राप्त होतात.

 

एव्हरेस्टच्या पश्चिम बाजूचे अवलोकन चांगल्या प्रकारे करता येत असल्याने तसंच पर्वतराजीच्या उत्तर आणि दक्षिण पश्चिम बाजूचाही चांगला वेध घेता असल्याने वेबकॅम बसवण्यासाठी काला पथ्थर या ठिकाणाची निवड करण्यात आली. वेबकॅम दर पाच मिनिटाला अद्यावत प्रतिमा टिपतो. त्यामुळे पर्वतराजीच्या अवतीभवती असलेल्या ढगांच्या हालचालींचे निरीक्षण हवामानतज्ज्ञांना करता येते.

 

वेबकॅमच्या प्रतिमा वायरलेस कनेक्शन मार्फत ५०५० मीटर्सवर असलेल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात. त्यानंतर हवामानातील बदल आणि जागतिक तापमानवाढीचा अभ्यास करण्यासाठी एव्हरेस्टचा डाटा आणि वेबकॅमच्या फूटेजचे विश्लेषण इटालीतील शास्त्रज्ञ करतात. जगातील सर्वाधिक उंचीच्या पर्वताची अचूक उंची परत मोजण्याचा स्वतंत्र नेपाळी प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे ज्यामुळे यासंबंधीचा गोंधळ संपुष्टात येईल.