स्विडनचा धुव्वा; इंग्लंडची क्वार्टर फायनकडे आगेकूच

अटीतटीच्या मॅचमध्ये इंग्लंडने स्विडनचा ३ विरूद्ध २ गोल्सनं पराभव करत अखेर युरो कप टूर्नामेंटमध्ये स्विडनला नमवण्याचा पराक्रम केलाय. या विजयासह इंग्लंडने ग्रुप डी पॉईंट टेबलमध्ये सेकंड पोझिशन मिळवली असून क्वार्टर फायनल गाठण्याकरता इंग्लंडला आता फक्त एका ड्रॉची आवश्यकता आहे.

Updated: Jun 16, 2012, 11:17 AM IST

www.24taas.com, कीव, युक्रेन

 

अटीतटीच्या मॅचमध्ये इंग्लंडने स्विडनचा ३ विरूद्ध २ गोल्सनं पराभव करत अखेर युरो कप टूर्नामेंटमध्ये स्विडनला नमवण्याचा पराक्रम केलाय. या विजयासह इंग्लंडने ग्रुप डी पॉईंट टेबलमध्ये सेकंड पोझिशन मिळवली असून क्वार्टर फायनल गाठण्याकरता इंग्लंडला आता फक्त एका ड्रॉची आवश्यकता आहे. मॅचच्या सुरूवातीपासूनच दोन्ही टीम्सनी आक्रमणावर अधिकाधिक भर दिला.

 

इंग्लंड विरूद्ध स्विडन टीम्सचा याआधीचा एकमेकांविरूद्धचा परफॉर्मन्स पाहता लीग स्टेजच्या मॅचमध्ये काय निकाल लागणार याकडेच फुटबॉल फॅन्सचं लक्षं लागून होतं. रंगतदार झालेल्या मॅचमध्ये अखेर इंग्लंडने मोठा उलटफेर घडवून आणताना स्विडनचा ३-२ असा पराभव केला. मॅचच्या सुरूवातीपासूनच दोन्ही टीम्सनी आक्रमणावर अधिकाधिक भर दिला. फर्स्ट हाफमध्ये तर दोन्ही टीम्सचं एकमेकांविरूद्धचं आक्रमण प्रतिस्पर्धी गोलकीपरची परीक्षा घेणारं ठरलं. अखेर फर्स्ट हाफच्या २३ व्या मिनिटाला इंग्लिश कॅप्टन स्टीव्हन जेरार्डच्या अचूक पासवर एँडी कॅरोलने हेडरद्वारे गोल करत इंग्लंडच्या गोलचं खातं उघडलं. १-० ने पिछाडीवर पडलेल्या स्विडनने सेकंड हाफमध्ये जोरदार सुरूवात करत इंग्लंडच्या गोलपोस्टवर हल्ले चढवायला सुरूवात केली. अखेर ४९ व्या मिनिटाला स्विडीश कॅप्टन इब्राहिमोविचने फ्री किकवर मारलेल्या शॉटला डिफेंडर मेलबर्गने गोलपोस्टचा रस्ता दाखवला आणि स्विडनने इंग्लंडशी बरोबरी साधली. त्यानंतर ५९ व्या मिनिटाला सेबेस्टीयन लार्सनच्या अचूक फ्री किकवर पुन्हा एकदा मेलबर्ग धावून आला आणि त्याने हेडरद्वारे गोल करत स्विडनला २-१ ने आघाडी मिळवून दिली. मेलबर्गचा आंतरराष्ट्रीय करिअरमधील हा ८ वा गोल ठरला. पिछाडीवर पडलेल्या इंग्लंडला सबस्टीट्यूट म्हणून आलेल्या वॉलकॉटने ६४ व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली.

 

पेनल्टी एरियाच्या बाहेरून मारलेल्या वॉलकॉटच्या किकला रोखण्यात स्विडीश गोलकीपर आंद्रेस इसाकसन अपयशी ठरला. या बरोबरीनंतर पुन्हा एकदा इंग्लंड-स्विडन मॅच ड्रॉ होणार का अशी शंका सतावत असताना ७८ व्या मिनिटाला वॉलकॉटच्या क्रॉस पासवर स्ट्रायकर डॅनी वेलबेकने अफलातून गोल करत इंग्लंडला ३-२ ने आघाडी मिळवून दिली. अखेर फुलटाईममध्ये स्विडीश टीम आणखी गोल करण्यात अपयशी ठरली आणि इंग्लंड टीमने युरो कपमधील पहिल्या विजयाची नोंद केली. इंग्लंडला टूर्नामेंटची फायनल गाठण्याकरता आता केवळ युक्रेनविरूद्ध होणाऱ्या शेवटच्या लीग मॅचमध्ये बरोबरी करणं आवश्यक आहे.

 

.