www.24taas.com, मुंबई
मध्य रेल्वे वाहतुकीला नेहमीच ग्रहण लागल्याचे आज दिसून आले. वांगणीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान ही वाहतूक सुरळीत झाली असली तरी लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा झाला.
वांगणीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यानं कर्जतकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवरही दिसून येत आहे. पुण्याकडे जाणा-या डेक्कन, कोयना आणि चेन्नई एक्स्प्रेस आदी गाड्या खोळंबल्या आहेत.
आज सकाळी साडे आठच्या सुमारास कर्जत लोकलच्या शेवटच्या डब्यांवरील तीन पेंटोग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकले. त्यामुळे ओव्हरहेड वायर तुटून खाली पडली. जवळ जवळ ५०० मीटर ओव्हरहेड वायर तुटली आहे. यामुळे गेले दीड तास बदलापूरहून कर्जतकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झालीये. वांगणी आणि कर्जत या मार्गावरील प्रवाशांना लोकल शिवाय कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यानं, त्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकांवर अडकलेले प्रवासी मिळेल त्या वाहनांनी रवाना झाले.
पुणे- मुंबई मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन सुमारे तासभर पिंपरी स्थानकावर थांबवून ठेवावी लागली. त्यामागोमागच्या सर्वच गाड्या अडकून पडल्या. त्यामुळे रोज सकाळी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. त्यानंतर ११ वाजून ५० मिनिटांनी सुटणारी पुणे - लोणावळा लोकल रद्द करून पुणे - कर्जत शटल गाडी सोडण्यात आली.