समाज हितासाठी लढणारे 'मृणाल' वादळ

मृणालताईंचा स्वभाव, राजकीय सामाजिक कारकीर्द याविषयीच्या अनेक पैलूंना मान्यवरांनी उजाळा दिला. सामान्य माणसांच्या प्रश्नांची तड लावणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे आयुष्य झाले होते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या कार्याची माहिती असणारे आणि त्यांना जवळून पाहिलेल्यापैकी काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. त्यांच्यात शब्दात..

Updated: Jul 18, 2012, 11:45 AM IST

www.24taas.com,मुंबई

 

मृणालताईंचा स्वभाव, राजकीय सामाजिक कारकीर्द याविषयीच्या अनेक पैलूंना मान्यवरांनी उजाळा दिला. सामान्य माणसांच्या प्रश्नांची तड लावणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांचे आयुष्य झाले होते. त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या कार्याची माहिती असणारे आणि त्यांना जवळून पाहिलेल्यापैकी काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. त्यांच्यात शब्दात..

 

शरद पवार, केंद्रीय कृषीमंत्री

मी आणि मृणाल गोरे यांनी अनेक वर्षे एकत्र काम केले. आमच्यात काही संघर्षही झाले; परंतु, वैयक्तिक संबंधांवर त्याचा परिणाम कधीही झाला नाही. विधानसभेत मृणालताई अत्यंत आक्रमकपणे प्रश्न मांडत असत. महागाईविरोधातील महिलांच्या मोर्चाने सारे सभागृह दणाणून सोडल्याचे मला आठवते आहे. मी मुख्यमंत्री असताना मृणालताई विरोधी पक्ष नेत्या होत्या. त्यामुळे सभागृहात अनेकदा संघर्षाचे प्रसंग येत असत. समाजवादासाठीच त्यांनी आपले सारे आयुष्य वेचले. इतकी लोकप्रियता असून, जनमानसात इतके मानाचे स्थान असूनदेखील मृणालताईंच्या वागण्याबोलण्यात कधीही कुठल्याही प्रकारचा उन्माद जाणवला नाही.

 

मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील दिंडोशी येथे सर्वसामान्यांच्या घरकुलांसाठी सरकारने मोठी जमीन दिली. नागरी निवारा प्रकल्पाला जमीन देतेवेळी त्यातीलएक मोठा भाग व्यापारी उपयोगात आणण्याची मुभा दिली होती. परंतु, कोणत्याही परिस्थितीत गरिबांच्या घरांसाठी मिळालेल्या या जागेच्या व्यापारी वापरातून पैसे कमावण्याचा मार्ग त्यांना मान्य नव्हता. किंबहुना व्यापारी वापरासाठी दिलेली जागा सरकारने परत घ्यावी, यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. पण, सरकार काहीच करीत नसल्याने त्या अस्वस्थ होत्या. ही अस्वस्थता मृणालताईंनी सहा महिन्यांपूर्वीझालेल्या भेटीत व्यक्त केली होती.

 

बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुख

बर्‍याच दिवसांपासून मला त्यांना जाऊन भेटण्याची इच्छा होती. त्या आजारीच होत्या व माझ्या आजारपणामुळे त्यांना भेटणे जमले नाही. आज त्यांच्या निधनाच्या बातमीने धक्काच बसला. मृणाल गोरे या खर्‍या अर्थाने रणराणिगी होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने त्यांचे ते रौद्र स्वरूप पाहिले आहे. अहिल्या रांगणेकर, मृणाल गोरे, तारा रेड्डी यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात पोलिसांना हैराण केले होते. एका ठिकाणी आंदोलन करताच पोलीस त्यांना अटक करून दुसर्‍या ठिकाणी नेऊन सोडायचे, तर पोलिसांच्या गाडीतून उतरताच त्यांचे तेथेच दुसरे आंदोलन सुरू व्हायचे. त्यांनी पोलिसांच्या कारवाईची आणि तुरुंगाची कधीच तमा बाळगली नाही. त्यांची सर्वच आंदोलने दणक्यात व्हायची. खर्‍या अर्थाने सरकारला 'पाणी पाजणारी' ती पाणीवाली बाई होती.  मृणालताईंसारख्या रणरागिणी निर्माण होवोत हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

 

पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या निधनाने सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आंदोलनांच्या माध्यमातून वाचा फोडणारा आवाज आता कायमचा शांत झाला आहे. एका दूरदृष्टी असलेल्या नेत्याला आपण कायमचे गमावले आहे. ज्या काळात महिलांनी सामाजिक कार्याच्या चळवळीत उतरणे अशक्य होते त्या कालावधीत मृणाल गोरे यांनी अहिल्या रांगणेकर यांच्या जोडीने महिला व पीडितांच्या सेवेत स्वत:ला झोकून दिले. महात्मा गांधी यांची विचारसरणी आयुष्यभर अंगीकारलेल्या मृणालताईंनी सामाजिक कार्याचा आदर्श समाजासमोर उभा केला. नागरी हक्क, महिलांचे हक्क, कामगारांचे प्रश्न, महागाईविरोधातील लढाई असो मृणालताईंनी गोरगरिबांच्या प्रत्येक लढय़ाचे नेतृत्व केले.