आनंदवारी... विठू माऊलीच्या दर्शनाला!

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, June 19, 2014 - 15:52

www.24taas.com,
ऋषी देसाई

आनंदवारी… मराठी मनाची… मराठी जनाची…
आनंदवारी... चैतन्यानं भारलेली… भारलेल्या चैतन्याची...
आनंदवारी... उत्साहान चालणाऱ्या दिंड्याची... अविरत घोष करणाऱ्या टाळ मृदुंगाची...

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाच्या परमोच्च सोहळ्याचं नाव म्हणजे आनंदवारी... दरवर्षी कोणत्याही निमंत्रणाशिवाय मराठी मनाचा हा कुळाचार वर्षानुवर्षे सुरु आहे… सातशे वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी ‘माझिया जिवाची आवडी, पंढरपूरा नेईन गुढी’ असा निर्धार केला होता. माऊलीनी प्रकट केलेली ती इच्छा आजही चढत्या वाढत्या उत्साहाने अवघा महाराष्ट्र भक्तीभावानं पूर्ण करतोय.
ज्येष्ठाची पौर्णिमा संपली की उभ्या मराठी मनाला वेध लागतात ते आनंदवारीचे... अवघ्या मराठी मनात हरीनामाचा गजर दुमदुमू लागतो. वर्षभर काळ्या आईची सेवा आणि संसारात बुडालेल्या मनाला जय जय राम कृष्ण हरी या सुरांची साद घालू लागते. सदोदीत संसाराचा व्याप घेउन जगणाऱ्या देहाला आत्मभानाचा मोह लागतो तो विठ्ठल या तीन अक्षरांचा... निस्वार्थी मनाला आनंदवारीचे वेध लागतात. प्रत्येक वर्षी विठ्ठलासाठी आनंदवारी आणि आनंदवारीसाठी विठ्ठल हा आनंदवारीतला विठ्ठल हा आनंदयोग सुरुच आहे.
विठ्ठल या तीन अक्षरांची जादू काय आहे याचा शोध प्रत्येक वर्षी आनंदवारीत घेतला जातो आणि दरवेळी विठ्ठल शोधायासी जावे आणि विठ्ठल बनावे हीच अवस्था देहाची होते. याच शोधाचं उत्तर शोधता शोधता स्वताचा शोध लागतो आणि आयुष्य कधी विठ्ठलमय बनून जाते हे कळतच नाही. ज्ञानेश्वरापासून ते हैबतबाबांपर्यत हा शोध सुरुच आहे. हा कानडा राजा पंढरीत आल्यापासून त्यानं अवघ्या त्यानं अवघ्या मराठी मनाला हरीनामाचं वेड लावलंय. विठू माऊली केवळ हरीनामावर वारकऱ्यांना आपल्या प्रेमपाशात गुंग करतेय आणि ही अवघी परिक्रमा आनंदवारी बनून जाते.

सर्व जगाचे कुतूहल बनून राहिलेली अशी ही पंढरीची वारी... शेकडो वर्षांपूर्वी या विराट जन समुदायाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव अशी अनेक अलौकिक नावं होती. भागवत धर्माची पताका या संतश्रेष्ठांनी आपल्या खांद्यावरुन वाहत आणली. विश्वंभर बाबा आणि हैबतबाबा यांनी सुरु केलेली ही वारी आज केवळ महाराष्ट्राचाच नाही तर साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतंय. स्वार्थ कलियुग, मोहाचा पगडा असलेल्या या जगात लाखो माणसे निस्वार्थी भावनेनं एकत्र जमत आनंदवारीत सामील होतात. टाळमृदुगांचा गजर, पालख्यांचं चैतन्यदायी अस्तित्व, दिंड्या पताकांनी भारलेलं वातावरण, वारकऱ्यांनी धरलेला फेर आणि डोईवर तुळशी वृदांवन घेतलेल्या बायाबापड्या... या सर्वांवर मुक्तपणे अबीर गुलाल उधळला जातो तेव्हा या चराचरात फक्त दोनच गोष्टी उरतात. चंद्रभागेच्या तिरावरच्या गाभाऱ्यातली ती विठूमाऊली आणि त्याच्या दर्शनासाठी व्याकुळलेली लेकरांची ही अवघी आनंदवारी...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, June 19, 2014 - 15:51
comments powered by Disqus