पैठणच्या संतपीठात दारुच्या बाटल्या...

संतांच्या विचारांच्या प्रसारासाठी पैठण नगरीत संतपीठ उभारण्यात आलंय..1975 साली घोषणा झालेल्या संतपीठाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी फेब्रुवारी 2014 साल उजाडले.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 18, 2014, 09:33 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पैठण
संतांच्या विचारांच्या प्रसारासाठी पैठण नगरीत संतपीठ उभारण्यात आलंय..1975 साली घोषणा झालेल्या संतपीठाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी फेब्रुवारी 2014 साल उजाडले. परंतु उद्धाटनानंतर दोनच दिवसांनी झी मीडियाची टीम ही इमारत पाहायला गेली, तेव्हा धक्कादायक वास्तव नजरेला पडलं... यावर संतपीठाच्या दुरावस्थेचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट..
अखेर 39 वर्षांची संतपीठाची प्रतिक्षा 13 फेब्रुवारी 2014 रोजी संपली... पैठण नगरीत संतपीठाच्या इमारतीचे उदघाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते संपन्न झालं. संताच्या साहित्याचा प्रसार, प्रचार व्हावा, त्यांचे वाड:मय सातासमुद्रापार जावे यासाठी हे संतपीठ म्हणजे संतांच्या साहित्याचे विद्यापीठ उभे राहिले... या संतपीठाची भव्यदिव्यता तपासण्यासाठी झी मीडियाची टीम याठिकाणी गेली, तेव्हा तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला...
उद्धाटनानंतर अवघ्या दोन दिवसानंतरची ही परिस्थिती आहे.. मुख्य प्रशासकीय बिल्डिंगच्या मागेच संतपीठाची दोन हॉस्टेल बनवण्यात आलीत. परंतु त्याठिकाणी राहणा-या वॉचमनने जणू या हॉस्टेलला आपला बंगलाच बनवलंय.. हॉस्टेलच्या सगळ्या रुम्स हा वॉचमन वापरतो.. त्याच्या तीनही मुलांसाठी स्वतंत्र रुम, किचन, हॉल, टेरेस असा आलिशान बंगला आयताच या हॉस्टेलच्या रुपाने वॉचमनला मिळालाय..
दुसरी इमारत म्हणजे मुलींसाठीचे हॉस्टेल. पण त्याची अवस्था तर भूतबंगल्यालाही लाजवेल अशीच... इमारतीची पूर्णपणे नासधूस झालीय.. काचा फुटल्यात, भिंतींना तडे गेलेत, प्लास्टरही निघण्याच्या मार्गावर आहे.. ही इमारत म्हणजे दारूड्यांचा अड्डा असावा अशीच स्थिती आहे.. सगळीकडे दारूच्या बाटल्यांचा खच, सिगारेटच्या पाकिटांचा ढीग... काही कपडे इथं काय चालतं याची साक्ष देण्यासाठी....
संत साहित्य शिकणा-या विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेल्या या पीठाचं आता उद्धवस्त पीठ झालंय.. अगदी घोषणेपासूनच हे संतपीठ कायम दुर्लक्षित राहिलं.. 1975 साली शंकरराव चव्हाणांनी संतपीठाची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा 1981 मध्ये अंतुलेंनी घोषणा केली.. त्यानंतर थेट 1998मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी या संतपीठाचे भूमिपूजन केले. तरीही या ना त्या कारणाने रखडत रखडत अखेर 13 फेब्रवारी 2014ला इमारतीचे उद्धाटन झाले.. इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर आणि प्रतिक्षेनंतरही संतपीठाच्या नशिबी आली ती दुर्दशाच..
संतपीठाची जी कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली, त्यातील 11 सदस्यांपैकी 7 जणांचा मृत्यू झालाय. उर्वरित 4 जण कुठे असतात, कुणालाच माहित नाही. संतपीठाचा अभ्यासक्रम अजून ठरलेला नाही. एकूणच संतपीठाच्या दुर्दैवाचे हे दशावतार निश्चितच महाराष्ट्राच्या गौरवशील संतपरंपरेला खिन्न करणारे आहेत..

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.