मुंबई सेंट्रल स्थानकातील रेल्वेचे देशातील पहिले फ्री-वायफाय सुसाsssट

भारताने 'डिजीटल इंडिया'चा नारा दिला आणि त्या अनुषंगाने आता पावले टाकायला सुरुवात केली आहे, ही चांगली बाब म्हणायला हवी. 

Updated: Jan 30, 2016, 04:18 PM IST
मुंबई सेंट्रल स्थानकातील रेल्वेचे देशातील पहिले फ्री-वायफाय सुसाsssट title=

संदेश स. सामंत 

भारताने 'डिजीटल इंडिया'चा नारा दिला आणि त्या अनुषंगाने आता पावले टाकायला सुरुवात केली आहे, ही चांगली बाब म्हणायला हवी. 
काही कामानिमित्ताने मी काल मुंबई सेंट्रल स्थानकावर लोकलने उतरलो आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सुटतात तिथून बाहेर पडण्याच्या दिशेने निघालो. तर समोरच नव्यानेच उद्घाटन झालेल्या 'फ्री वाय फाय' सेवेचा फलक दिसला. 

गेल्या आठवड्यात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू मुंबईत आले होते, ते मुंबई सेंट्रल येथे लावलेल्या देशातील रेल्वे स्थानकातील पहिल्या फ्री-वायफाय सेवेचे उद्घाटन करायला. गुगलचे CEO सुंदर पिचाई गेल्या वर्षी भारतात आले होते, तेव्हा भारतातल्या ४०० रेल्वे स्थानकांवर फ्री वायफाय सेवा देणार असल्याची घोषणा झाली होती. 

या सेवेची गरज काय?
खरं तर जगभरात अनेक ठिकाणी याप्रकारच्या सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहेत. नव्याने शहरात येणाऱ्या प्रवाशांसाठी किंवा परदेशी नागरिकांसाठी याप्रकारच्या सुविधा कोणत्याही आधुनिक राष्ट्राने पुरवणे अपेक्षित असते. वाढत्या पर्यटनाने रेल्वेला आणि पर्यायाने देशालाच चांगला महसूल मिळू शकतो. काहींना रेल्वेविषयीच काही माहितीची गरज भासू शकते. प्रत्येक वेळी सायबर कॅफे सापडणे शक्यही नसते.

वापर कसा सुरू करावा? 
नेहमीच सरकारी सुविधांकडून फारशी अपेक्षा नसल्याने यातूनही काही निष्पन्न होईल असे वाटत नव्हते. पण, तरी म्हटलं एक प्रयत्न करू. म्हणून मोबाईल काढला आणि वाय-फाय सुरू केले. 'RailWire' वायफायवर क्लिक केले तर ते लगेच कनेक्ट झाले. पुढे ब्राऊझर उघडले आणि एक वेबसाईट उघडण्याची विनंती केली असता साईन इन करण्याची विनंती आली. आलेल्या चौकटीत मोबाईल क्रमांक रजिस्टर केला असता मॅसेजने माझ्या मोबाईलवर रेल्वेने पाठवलेला OTP क्रमांक टाकण्याची सूचना आली. पण, मला असा काही क्रमांक आला नव्हता. 
म्हटलं दोन मिनिटे थांबावे. तरी काही मॅसेज आला नाही. म्हणून मग ब्राऊजर बंद केले आणि पुन्हा एकदा सुरू केले. एक वेबसाईट ओपन करण्याची रिक्वेस्ट करताच पुन्हा रजिस्ट्रेशनची विंडो आली. पुन्हा मोबाईल क्रमांक रजिस्टर केला तर अगदी ४-५ सेकंदात OTP क्रमांक आला. तो टाईप करून OK केल्यावर लगेच माझे रजिस्ट्रेशन झाल्याचा मॅसेजही आला.

स्पीड कसा आहे?

आता वाय फाय वापरायला सुरुवात केली तर स्पीड चांगलाच होता. पहिल्यांदा यूट्यूब सुरू केले. यूट्यूब वरील व्हिडिओ जराही बफर न करता पूर्ण व्हिडिओ पटापट लोड होत होते. 
काही गाणी डाऊनलोड केली तर ती पण काही सेकंदात डाऊनलोड झाली. म्हणजे या वायफायचा स्पीड तर उत्तम आहे. पण, हा स्पीड एका तासानंतर मात्र कमी होतो, अशी पूर्वसूचना दिली जाते. एखाद्या व्यक्तीने खूप वेळ एकाच ठिकाणी घालवून भरपूर डेटा डाऊनलोड करू नये, हा यामागचा उद्देश; जो रास्तच आहे. 
हा स्पीड जरी कमी झाला तरी फेसबूक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि बेसिक वेबसाईट्स यांसारख्या सेवा मात्र नीट चालतात. त्यामुळे स्टेशनवर टाईमपास करायचा असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. 

कुठे कुठे वापरू शकता? 
वायफायची रेंज ही मुख्य इमारतीत जवळपास सर्वत्र चांगली आहे. पण, इमारतीतून बाहेर आलं की मात्र ती स्टेशनच्या आवारातही ती मिळत नाही. मुख्य इमारतीतून लोकल प्लॅटफॉर्म्सकडे जाताना जाव्या लागणाऱ्या रॅम्पच्या जिन्यातही वायफाय मिळत नाही. पण, फूटओव्हर ब्रिजवर मात्र ती चांगली आहे. 
विशेष म्हणजे आज सकाळी पुन्हा ऑफिसला येताना चर्नी रोडहून ट्रेन पकडली. नेहमीप्रमाणे सोशल मीडिया तपासत होतो. ट्रेन जशी मुंबई सेंट्रलमध्ये आली तसा मोबाईल जरा हँग झाला. पाहिलं तर वायफाय आपोआप कनेक्ट झाले होते. ते पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. त्या अर्ध्या मिनिटात स्पीड तपासायला वेळ नव्हता. पण तरी फेसबूक पटापट चालत होते. ट्रेनने स्टेशन सोडेपर्यंत वायफाय नीट सुरू होते. 

तांत्रिक बाबतीत मदत हवी असल्यास काय करावे?
एक महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वेने ही सेवा जे पहिल्यांदा वापरणार आहेत अशांच्या मदतीसाठी काही तरूणांना मुख्य इमारतीत खानपान केंद्राकडे मदतनीस म्हणून रुजू केले आहे ज्यांची तुम्ही मदत घेऊ शकता. वृद्ध लोकांसाठी हे स्वयंसेवक फार उपयोगी ठरू शकतात. या सेवेची माहिती देण्यासाठी आणि वायफायशी कनेक्ट होण्यासाठी हे स्वयंसेवक मदत करतात. 

रेल्वे मंत्रालयाने नागरिकांना ही सुविधा वापरुन आपल्या प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे. लोकशाही ही लोकसहभागातून चालत असते. तेव्हा सरकारला आपला अभिप्राय प्रत्येकाने कळवणे आवश्यक आहे.