बचाव कार्यात अडथळे, फुटीरवाद्यांचा प्रयत्न काश्मिरी जनतेनेच हाणून पाडावा

१५ सप्टेंबरला फुटीरतावादी नेता यासिन मलिकने मदत कार्याची नौकाच पळवून नेली आहे. १६ सप्टेंबरला जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्हयात एलओसीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले . यात बीएसएफच्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले आहे.

Updated: Sep 18, 2014, 07:45 PM IST

भूतान आणि भारताची बाह्य-अंतर्गत ऊर्जा सुरक्षा
 

ब्रिगेडिअर हेमंत महाजन : १५ सप्टेंबरला फुटीरतावादी नेता यासिन मलिकने मदत कार्याची नौकाच पळवून नेली आहे. १६ सप्टेंबरला जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्हयात एलओसीजवळ दोन बॉम्बस्फोट झाले . यात बीएसएफच्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले आहे.

जम्मू-काश्मीरमधील जलप्रलयात तेथील माणसे-घरे, प्राणी  वाहून गेले.  त्याचप्रमाणे या महापुरात जम्मू-काश्मीरमधील ओमर अब्दुल्लांचे सरकारही वाहून गेले आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे तरुण आहेत. ते खासदार असताना त्यांची संसदेतील आवेशपूर्ण भावूक भाषणे ज्यांनी ऐकली आहेत, त्यांना ,पिताश्री फारुख अब्दुल्ला यांच्या राज्य कारभाराहून चांगला कारभार करतील, असा होरा होता. पण ओमर यांनी तो फोल ठरविला.  पिताश्री फारुक अब्दुल्ला व आजोबा शेख अब्दुल्ला यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत जम्मू-काश्मीरच्या विकासाचे कसे हसे करून ठेवले होते, त्याची आठवण येते आहे. केंद्र सरकारने गेली सहा दशके योग्य ती काळजी घेत आहे. केंद्र सरकारकडून  जम्मू-काश्मीरला दरवर्षी ईतर राज्याच्या १४ पट जास्त आर्थिक मदत केली जाते. तरीही या राज्याचा विकासच होऊ शकलेला नाही.

आता धोका रोगराईचा 
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लष्कर, वायुसेना, एनडीआरएफच्या जवानांनी रात्रंदिवस राबून मोठीच मदत केल्यामुळे आम्ही त्यांचे ऋणी आहोत, असे कृतज्ञतापूर्वक उद्गार काढले. मदतीचा जो ओघ सुरू झाला, तो संपूर्ण जग विविध वाहिन्यांवर पाहतच आहे.गेल्या आठवडाभरापासून लष्कर तेथे जिवाची पर्वा न करता, प्रलयात अडकलेल्यांना शोधून, बाहेर काढून सुरक्षित स्थळी पोहोचविण्यासाठी झटत आहेत. मदतकार्य वेगाने केल्यामुळे, 2.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात यश आले. पाणी ओसरल्यावर आता मृतदेह सापडत आहेत. यामुळे तेथे रोगराई पसरण्याचा मोठा धोका आहे.या मृतदेहांना बाहेर काढण्याचे मोठे काम  लष्करालाच करावे लागेल.

जम्मू-काश्मीरमध्ये आलेली ही विपदा राष्ट्रीय आपत्ती आहे. विविध राज्ये, उद्योगपती, वाहिन्या, वर्तमानपत्रे मदतनिधी देत आहेत. साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी विमानातून मोठमोठे पंप, जेसीबी आणि चिखल काढणारी यंत्रे पाठवली गेली आहेत. 


 

काश्मीरचे नतद्रष्ट नेते 
पण, काही नतद्रष्ट नेते या राष्ट्रीय आपत्तीचे राजकारण करीत आहेत. पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती या राजनाथसिंहांशी फोनवरून बोलल्या. त्यांनी अजूनही राज्याला केंद्राकडून पुरेशी मदतच मिळाली नाही, अशी अफलातून तक्रार करून नाराजी व्यक्त केली. आठवडाभर त्या आणि त्यांचे कार्यकर्ते झोपले होते का? लष्कराकडून जे मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे, ते त्यांना दिसले नाही का? त्या म्हणाल्या, जी काही मदत केली ती लष्कराने आणि काही स्वयंसेवी संघटनांनी. नशीब त्यांनी लष्कराला धन्यवाद दिले! ओमर अब्दुल्ला म्हणाले की, सहा महिने मोफत धान्य देऊ. कुठून देऊ, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. १४/०९/२०१४ला  राज्यातील मंत्र्यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींना भेटले. अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अविरत सुरू ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. म्हणजे केंद्र कोट्यवधींचे अन्नधान्य सहा महिने पुरविणार आणि ओमर ते फुकटात वाटणार? नंदनवनाचा नर्क बनवणारे  म्हणून अब्दुल्ला कुटुंबियांचे नाव काश्मीरच्या इतिहासात नक्कीच अजरामर होईल.


 

फुटीरतावाद्यांचे फूत्कार
लष्करप्रमुखांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कराचे जवान स्वतःचे जीव धोक्यात घालून अहोरात्र कार्यरत राहिलेले असताना, त्यांना सहकार्य करण्याऐवजी त्यांच्या विरोधात लोकांना भडकावण्याचा  फुटीर शक्तींनी चालविलेला खटाटोप  खपवून घेता येणार नाही .भारतीय लष्कराच्या या कार्याची काश्मीरवासीय जनतेकडून उचित दखल घेतली जात असून फुटीर शक्तींना नेमकी हीच वस्तुस्थिती सहन होत नसावी. भारतीय लष्कराकडून तेथील सर्वसामान्य जनतेवर अन्याय होत असल्याचे चित्र उभे करण्याचाचाही प्रयत्न होत आहे.बचावकार्यादरम्यान पर्यटक आणि व्हिआयपी लोकांवर विशेष लक्ष दिले जात असल्याची खोऱयात अफवा पसरविली जात आहे.काश्मीर राज्यातील काही संधीसाधू राजकारण्यांचा वापरदेखील या मागणीच्या पाठपुराव्याकरता होत आहे.भारतातील काही तथाकथित  विचारवंतदेखील फुटीरांच्या अपप्रचारला  फसून काश्मीरात अन्याय होत आहे असे सांगत आहेत. 
फुटीरांच्या अपप्रचाराला मदत कार्यातूनच चोख उत्तर फुटीरांच्या अपप्रचाराला जवानांनी आपल्या शर्थीच्या मदत कार्यातूनच चोख उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसात लष्करी जवानांवर बचावासाठी कार्यरत लष्करी बोटी अन् हेलिकॉप्टरवरदेखील तुफान दगडफेकीच्या घटना झाल्या आहेत.  

लष्कराची एकूण ८० हेलिकॉप्टर व विमाने पूरग्रस्तांसाठी कार्यरत आहेत. मदतसाहित्याचे वाटप करण्यासाठी हेलिकॉप्टर अगदी खालून उड्डाण करू शकतात. यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. दगडफेकीच्या घटना बचावकार्यासाठी अडथळा आहे, तर पुरात अडकलेल्या लोकांच्या बचाव अधिकाराच्या देखील विरूद्ध आहेत.लष्कराच्या मदत सामग्रीवाल्या ट्रकांना लक्ष्य बनविले जात आहे.

आता कसोटी कश्मिरी जनतेची ज्यावेळी संपूर्ण जम्मू-कमीर, तेथील सर्वसामान्य नागरिक, त्यांची कुटुंबे, घरे पुराच्या पाण्याखाली होती तेव्हा फुटीरतावादी बिळांमध्ये लपून बसली होती. पूर ओसरू लागल्यामुळे हे राष्ट्रद्रोही बाहेर येऊ लागले आहेत. अर्थात आता कसोटी कश्मिरी जनतेची आहे.  लष्कराच्या तोंडी कौतुकावरच तिने थांबू नये. दुहीचे विष पेरणाऱ्या फुटीरतावादीना आता कश्मिरी जनतेनेच ठेचून काढले पाहिजे,व दगडफेक करणार्यांना पकडून पोलिसांच्यां ताब्यात दिले पाहिजे. आपल्या मदतकर्त्यांवरच दगडफेक करण्याएवढी काश्मिरी जनता कृतघ्न निश्चितच नाही. पाकधार्जिण्या फुटीरांचा हा हेतू काश्मिरी  जनता हाणू पाडेल यात शंका नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.