रुईया... आयुष्यातलं एक स्वप्न!

रुईया... माझ्या शाळेच्याच बाजूला असणार हे कॉलेज... शाळा सुटल्यानंतर घरी परतताना मला 'रुईया कॉलेज'च्या गेटकडे पाहून वाटायचं की आपल्यालासुद्धा हेच कॅालेज हवं...

Updated: May 4, 2017, 04:07 PM IST
रुईया... आयुष्यातलं एक स्वप्न! title=

प्रियांका सोहनी, मुंबई : रुईया... माझ्या शाळेच्याच बाजूला असणार हे कॉलेज... शाळा सुटल्यानंतर घरी परतताना मला 'रुईया कॉलेज'च्या गेटकडे पाहून वाटायचं की आपल्यालासुद्धा हेच कॅालेज हवं...

मी 10 वी पास झाले तेव्हा रुईयाचं हवं म्हणून ठरवलं होतं... परंतु मला टक्केवारी कमी असल्यानं इथं अॅडमिशन मिळणार नाही, हे लक्षात आलं. बीएसाठी माझा नंबर रुपारेल महाविद्यालयात आला, त्यावेळेस मी आनंदी होते... पण जे हवं ते नाही मिळालं की कुठेतरी खुपत असतं तसचं माझ्या बाबतीत होत होतं...  

अॅडमिशन प्रोसेस पूर्ण करून घरी परततंच होते तेवढ्यात रुईयाच्या लिस्टमध्येही नाव आलं, हे समजलं... आणि माझं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद झाला. दुसऱ्याच दिवशी जाऊन रूपारेलचं अॅडमिशन रद्द केलं आणि रूईयाला घेतलं... तो दिवस अतिशय आनंदाचा आणि माझ्यासाठी वेगळाचं होता. ज्या दिवशी कॉलेजबाबत मिटिंग होती तेव्हा कॅालेज पाहायला मिळणार हा जास्त आनंद होता.

अॅडमिशननंतर काही दिवसांनी रुईयातल आयुष्य सुरू झालं नाटकाची आवड असल्यामुळे मला 'रुईया नाट्यावलय'मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली... आणि माझा नाटकाचा प्रवास सुरू झाला. 

बारावीनंतर शिकण्याची फारशी इच्छा नव्हती परंतु आई बाबांच्या इच्छेखातर डिग्रीसाठी मी BA ला अॅडमिशन घेतलं. पण इच्छा नसताना केलेली गोष्ट उपयोगी नसते... तसचं माझ्या बाबतीत झालं... त्या वर्षी मला ड्रॉप लागला... त्यामुळे BA पुढे शिकण्याची उरली सुरलेली इच्छाही संपली... 

बाबांची इच्छा होती की मी BMM करावं... मला हे जमेल किंवा नाही हे प्रश्नचिन्ह माझ्यासमोर होतंच... पण, माझी स्वत:चीही या क्षेत्रात शिकण्याची आणि काम करण्याची इच्छा होती... त्यामुळे आता आपण करायचंच हा विचार पक्का केला आणि अॅडमिशन घ्यायला गेले तेव्हा तू उद्या ये असं सांगितलं आणि मला अॅडमिशन मिळालं. त्या दिवसापासून ते आजपर्यंत खूप काही अनुभवयला, शिकायला मिळालं... रुईयात अगदी शेवटचे दिवस उरलेत... बाहेर पडताना एक वेगळा अनुभव आणि रुईयाची विद्यार्थिनी म्हणून खूप छान वाटतंय... खरोखर, आयुष्यात रुईया असावं आणि रुईयात आयुष्य असावं..