बांग्लादेशात दहशतवादी हल्ला आणि त्याचा भारतावर परिणाम

मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे. 

Updated: Jul 8, 2016, 11:26 PM IST
बांग्लादेशात दहशतवादी हल्ला आणि त्याचा भारतावर परिणाम title=

हेमंत महाजन, मुंबई : मुस्लिम धर्मातील सगळ्यात पवित्र असा रमझान ईदचा सण किंवा उत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना आशियातील अनेक देशांमध्ये जो रक्तपात सुरु आहे तो अंगावर काटा आणणारा आहे. 

जमायतुल मुजाहिदीन, आयएसआयचा हात 

बांगलादेशची राजधानी ढाक्यात १ जुलैला शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे इसिसचा नाही, तर बांग्लादेशातीलच जमायतुल मुजाहिदीन या अतिरेकी गटाचा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा हात आहे, असे बांग्लादेशचे गृहमंत्री असादुझमन खान यांनी सांगितले.

मी सांगू इच्छितो की, बांग्लादेशात इसिस किंवा अल् कायदाचे अस्तित्व नाही. ज्या अतिरेक्यांनी नागरिकांना ओलिस धरले होते, ते आमच्याच देशातील आहेत. आम्ही त्यांनाच नाही, तर त्यांच्या पूर्वजांनाही चांगले ओळखतो. ते सर्व याच मातीत मोठे झाले आहेत आणि या हल्ल्यासाठी त्यांना पाकच्या आयएसआयकडून सर्व प्रकारची मदत पुरविण्यात आली आहे.

पंतप्रधान शेख हसिना यांचे राजकीय सल्लागार हुसैन तौफिक यांनीही अशाच प्रकारची माहिती दिली. पाकची आयएसआय आणि जमातचे संबंध संपूर्ण जगाला माहीत आहे. शेख हसिना सरकार पदच्युत करणे आणि देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या कटाचा हा भाग आहे. बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमाते इस्लामीसुध्दा देशभर जातीयवाद पसरवत आहे.

बांग्लादेशची राजधानी ढाका येथे शुक्रवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बांग्लादेशच्या मंत्र्यांच्या मुलाचाही समावेश आहे.रोहन इम्तियाज असे दहशतवाद्याच नाव असून, त्याचे वडील एस. एम. इम्तियाज खान बाबूल हे सत्ताधारी पक्ष आवामी लिगचे नेते आहेत

सात अतिरेक्यांनी ढाक्यातील विदेशी दूतावास असलेल्या परिसरातील आर्टिसन बेकरीवर हल्ला केला होता. अतिरेक्यांनी २० विदेशी नागरिकांची गळे चिरून हत्या केली होती. कारवाईत ठार करण्यात आलेल्या सर्व सहा अतिरेक्यांची छायाचित्रे पोलिसांनी जारी केली आहेत. सातवा अतिरेकी ताब्यात असून, गुप्तचर यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू आहे.

ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 28 जण मृत्यूमुखी पडले आहेत.त्यात 20 पर्यटक, दोन पोलिस आणि सहा दहशतवादी आहेत. त्यात अमेरिकन, जपानी, इटालीयन व भारतीयही होते.प्रत्यक्षात 35 पैकी 20 परदेशी पर्यटक ठार झाले आहेत आणि उर्वरित 15 जणांबद्दल बांगलादेशचे गृहखाते अजून काही सांगण्यास तयार नाही . 

अतिरेक्यांचा निषेध निरर्थक

बांग्लादेशात गेल्या दोन वर्षांत अनेक हिंदूंवर हल्ले झाले आहेत. ज्या दिवशी आर्टिझन हॉटेलवर हल्ला झाला त्याच सुमारास बांगलादेशात अवघ्या चोवीस तासात दोन हिंदू पुजार्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. याखेरीज बांगलादेशात सुधारणावादी व पुरोगामी ब्लॉग लेखकांची हत्या करण्यात आल्याची उदाहरणे आहेत. तेथे जातीय तणाव आहेच. हिंदूसह ख्रिश्चन, बौध्द यांच्यासारखे अल्पसंख्याकही जीव मुठीत घालूनच राहत आहेत. 

बांग्लादेशातील अवामी लीग पक्षाच्या सरकार पुढील मोठे बिकट आव्हान आहे. पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी जहाल इस्लामवाद्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. बांग्लादेश मुक्तीच्या लढ्याच्या वेळी ढाका येथे जो मोठा नरसंहार जमात-ए-इस्लामीने घडवून आणला होता, त्यातील अनेक नेते व कार्यकर्ते यांच्यावर खटले चालवून त्यांना फाशीपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षा सुनावल्या जात आहेत. त्यामुळे बांग्लादेशातील जहाल इस्लामवादी शेख हसिना यांना अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत.

दहशतवाद मोडून काढला पाहिजे

जागतिक समुदायाने आणि सर्व धर्मियांनी वज्रमूठ करून हा दहशतवाद मोडून काढला पाहिजे आणि दहशतवाद्यांना व त्यांना पोसणाऱया शक्तींना नेस्तनाबूत करून अतिरेक्यांचा बीमोड केला पाहिजे. दहशतवाद्यांनी 20 जणांचे गळे चिरले, त्यामध्ये तरूषी जैन ही भारतीय तरूणी आहे.19 वर्षाच्या या तरूणीचे आयुष्य अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आले. 19 निरापराध नागरिकना  क्रुरतेने मारण्यात आले, त्या कृत्याचे कोणत्याही धर्मात, समर्थन होऊ शकत नाही. 

ज्या कुटुंबीयांना अशा हल्ल्याची झळ पोहोचते त्यांना आयुष्यातून उठण्याची वेळ येते. त्यांचे जीवन उद्ध्वस्त होते. कोणताही दोष वा कारण नसताना अवघे कुटुंब होरपळून निघते. जनसामान्यांची सहानुभूती, अतिरेक्यांचा  झालेला निषेध, या कुटुंबीयांचे दुःख, हानी भरून काढू शकत नाही.दहशतवाद आणि धर्माचा कोणताही संबंध नाही हा विचार सर्वदूर बळावला पाहिजे. विश्व समुदायाने हातात हात घालून दहशतवादाचा बीमोड केला पाहिजे.

दहशतवाद्यांचा अर्थ पुरवठा थांबवा 

दहशतवादास निरनिराळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्रोतांकडून अर्थ पुरवठा होतो. दहशतवादाचा सामना करण्याचा एक प्रभावी उपाय म्हणजे अमली पदार्थांचा व्यवसाय, लुटालूट, खोट्या चलनी नोटांचे व्यवहार, खोटे धर्मादाय निधी तसेच हवाला आणि दिखाऊ पेढ्यांसारखे व्यवहार या सर्व स्रोतांविरुद्ध बहुआयामी हल्ला करणे हाच होय. अर्थपुरवठा थांबला तर दहशतवादास मोठा धक्का दिला जाऊ शकतो.

जगातले भंपक मानवतावादी

तुम्ही जिहादी दहशतवाद्यांना कसे हाताळता, यासाठी अवघ्या जगातले मानवतावादी डोळ्यात तेल घालून पहारा देत असतात; पण सामान्य माणसाच्या जीवाशी जो खेळ चालू आहे, त्यात पडणार्‍या बळींची कोणाला फिकीर नाही. हे जिहादी दहशतवादाचे यश आणि जगभरच्या कायदेशीर सत्तांचे मोठे अपयश आहे. आपल्या देशात दहशतवादी खटले १५-२० वर्षे चालतात.बहुतेक दहशतवादी व त्यांच्या समर्थकांना फ़ारशी शिक्षा मिळत नाही.  जेव्हा कायदा कुठलेही हिंसक प्राणघातक हल्ले रोखू शकत नाही, किंवा हल्लेखोरांना तितक्याच भयंकर शिक्षा देत नाही, तोवर अशा मरायला उतावळ्या झालेल्या जिहादींना पायबंद घालणे शक्य नाही.

जगातला श्रीलंका हाच एकमेव देश असा दाखवता येतो, की त्याने यशस्वीरित्या आपल्या भूमीतील दहशतवाद मोडून काढला आहे. निपटून काढल्यावर तिथे दहशतवाद पुन्हा डोके वर काढू शकलेला नाही. त्याचे मुख्य कारण त्यांनी मानवाधिकाराचे झुगारलेले जोखड.

दुबई-कुवेत किंवा सौदी अरेबिया अशा देशातून जिहादी हिंसेला पतपुरवठा होतो; पण त्याच देशात त्या जिहादचा धुमाकूळ कधी होत नाही. कारण, तिथेही मानवाधिकाराला स्थान नाही. जिहादींचे आश्रयदाते त्यांचे समर्थक व मानवाधिकारी आहेत. तेव्हा ढाक्यातले हल्लेखोर ‘इसिस’शी संबंधित आहेत, की स्थानिक हुजीचे जिहादी आहेत, असल्या चर्चा, तपास फसवे असतात. 

असे जे कोणी जिहादी अतिरेकी असतात, त्यांची हिंमत, कारस्थान वा हत्यारांपेक्षाही त्यांना आश्रय व संरक्षण देणारे खरे गुन्हेगार असतात. म्हणूनच मग त्यात कोण कुठल्या देशाचे नागरिक मारले गेले, किंवा स्थानिकांचा बळी पडला, असल्या चर्चा वांझोट्या असतात. अशा हिंसाचाराच्या निर्मूलनाची चर्चा व्हायला हवी आणि त्यावरचे उत्तर सोपे सरळ आहे. असा हिंसाचार घडवून आणणार्‍यांना आपण काहीतरी उदात्त पवित्र कार्य करत आहोत, असे वाटत असते. त्यासाठी मृत्यूला कवटाळण्याचीही त्यांची इच्छा असते.ज्यांना अशा तर्‍हेने मृत्यूला कवटाळण्याची अनावर इच्छा झालेली आहे, त्यांना शोधून काढून टिपणे, इतकाच एक उपाय आहे. 

गुप्तवार्ता संकलनात सुधारणा करणे जरुरीचे 

सीमावर्ती भागातले, दुहेरी हेर (Double agents) आणि आयएसआय कार्यकर्ते निष्प्रभ केले पाहिजेत. पूर्वसूचना देणार्‍यांना/ खबर्‍यांना आणि समर्थ स्रोतांना प्रोत्साहन देणे जरुरीचे आहे. गुप्तवार्ता संकलन आणि त्याचे आधुनिकीकरण जरुरीचे आहे. दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर, राहण्याच्या जागांवर छापे, दहशतवादी लपलेल्या गावांना वेढे आणि शोध कार्यवाही, रस्त्यावरून जाणार्‍या गाड्या आणि माणसांचा अचानक तपास अशा आक्रमक कारवाया लष्कराला वाढवाव्या लागतील. 

इसिस आता देशात

भारताच्या दरवाजापर्यंत ‘इसिस’चे संकट येऊन ठेपल्याचे आतापर्यंत मानले जात होते. पण हैदराबाद येथील अटकसत्राने हे संकट आता देशात पोचल्याचे दाखवून दिले आहे. ढाक्यात हल्ला झाला, त्याच्या तीनच दिवस आधी भारताच्या ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने ‘इसिस’पासून प्रेरणा घेऊन आणि या दहशतवादी संघटनेच्या मदतीने देशात घातपात घडवून आणण्याचा कट आखणाऱ्या ११ तरूणांना ताब्यात घेतले. हे सर्व जण इसिसच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याचा अर्थ आपल्या गुप्तवार्ता यंत्रणा सतर्क आहेत. 

पण, केवळ एवढ्याने भागणार नाही. अगदी कनिष्ठ पातळीपासून तर वरिष्ठ स्तरापर्यंत ही सतर्कता दिसली पाहिजे. जगभरात दहशतवादी हल्ल्यांत हजारो लोकांचे रक्त सांडविल्यानंतर आता इसिसने भारताला लक्ष्य करण्याची घोषणा केल्यामुळे, भारताच्या गुप्तवार्ता आणि सुरक्षा यंत्रणेपुढे आगामी काळात मोठी आव्हाने उभी ठाकण्याची चिन्हे आहेत. 

गेल्या एप्रिलमध्ये बांगला देशातील बंगाल खिलाफाचा म्होरक्या अबु इब्राहिम अल्-हनिफा याने एका पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत, भारतात अतिरेकी हल्ले करणार असल्याचे उघडपणे म्हटले आहे.या लोकांनी भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्तान आणि बांगला देशला आपला अड्‌डा बनविला आहे. इसिस या संघटनेला पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय)चा पाठिंबा आहे.  

बांग्लादेशी घुसखोर अणि तस्करी

एकदा का आमचा पाकिस्तान आणि बांगला देशात जम बसला की, या दोन देशांच्या भूमीवरून भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम भागात घुसून तेथे दहशतवादी हल्ले करण्याचा मनसुबा असल्याचे अबु इब्राहिमने म्हटले आहे. पूर्वेतील राज्यांमध्ये बांगला देशातून आलेल्या घुसखोरांना तयार करण्याची यांची योजना आहे. 

लाखो बांग्लादेशी घुसखोर पूर्वांचलात कितीतरी वर्षांपासून सुखेनैव जीवन जगत आहेत. यापैकी काही जण हे मादक द्रव्य आणि शस्त्रांच्या तस्करीत सहभागी आहेत. आता या लोकांनी ममता बॅनर्जी यांच्या कृपेने पश्‍चिम बंगालच्या सीमावर्ती भागात  बस्तान मांडले आहे. यात शेकडो लोक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असूनही ममता त्यांची पाठराखण करीत आहेत. मागे, उत्तरप्रदेशमधील एका घटनेची प्रतिक्रिया प. बंगालमध्ये दोन महिन्यांनंतर उमटली होती. सुमारे ७० हजार बांगलादेशीनी मोर्चा काढून पोलिस चौक्या जाळल्या होत्या व पोलिसांची शस्त्रे हिसकली होती. हे सर्व लोक मादक द्रव्य माफियांचे लोक होते आणि ते तृणमूल कॉंग्रेसला सर्वतोपरी मदत करीत आहेत. 

पाकिस्तानमध्ये तर गेल्या तीन वषार्र्ंपासून जागोजागी इसिसचे झेंडे फडकण्याच्या घटना घडल्या आणि अजूनही घडतच आहेत. इसिसने फार आधीपासूनच काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाय पसरण्यास सुरुवात केल्याचे हे निदर्शक आहे. त्यामुळे बांग्लादेश आणि पाकिस्तानातून सर्वांधिक धोका आज निर्माण झाला आहे. भारतापुढे इसिसचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.भारताला पाकिस्तान, बांगला देश आणि अफगानिस्तानच्या सीमावर्ती भागांकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार आहे.